America monsoon predict : अमेरिकेच्या हवामान विभागाकडून भारतीयांचीं चिंता वाढवणारा एक धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला आहे. अमेरिकन हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार आहे. यामुळे हा अंदाज जर सत्यात उतरला तर देशातील शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.
भारतात एकदाच्या मान्सून काळात अल निनोचा धोका असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, यंदा जून ते ऑगस्ट या काळात भारतात अल निनो सक्रिय राहणार आहे. या कालावधीमध्ये 49% आणि 47% ही सामान्य परिस्थिती राहणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या हवामान विभागाकडून सर्वप्रथम जुलै महिन्यापासून अल निनोचीं परिस्थिती भारतात राहील असं म्हटलं होत मात्र आता नवीन अहवालानुसार जून ते ऑगस्ट ही परिस्थिती तयार होणार असल्याचे सांगितले आहे.
याबाबत मात्र काही तज्ञांनी आताच यावर भाष्य करणे घाईचे ठरेल असे मत व्यक्त केल आहे. हा अंदाज जानेवारी महिन्यातील परिस्थिती पाहून वर्तवण्यात आला आहे त्यामुळे पुढील महिन्यात यामध्ये बदल देखील घडू शकतो असं काही तज्ञ सांगत आहेत. याशिवाय कोट्टायम येथील इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट चेंज स्टडीजचे संचालक डी शिवानंद यांनी मात्र या अहवालावर गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
त्यांच्या मते जर एखादे मॉडेल किंवा संस्था सलग दोन महिने अल निनोचे संकेत देत असेल, तर त्याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. मात्र त्यांनीही भारतीय मान्सूनचे स्पष्ट चित्र एप्रिल-मे महिन्यातच दिसू शकते, असे यावेळी बोलताना नमूद केले आहे. त्यांनी सांगितले की पॅसिफिक प्रदेशात वसंत ऋतुनंतर परिस्थिती ही बदलत असते. यामुळे याबाबत योग्य ती परिस्थिती एप्रिल ते मे या कालावधीत स्पष्ट होणार आहे.
एकंदरीत अमेरिकेच्या हवामान विभागाने वर्तवलेला हा अंदाज किंवा अहवाल अजून गर्भातच असला तरीही यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणारी आहे. जर हा अंदाज सत्यात उतरला तर भारतीय शेतकऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा सिद्ध होऊ शकते. भारतीय शेती वास्तविक पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर आधारित आहे.
अशा परिस्थितीत जगातील एका नामांकित संस्थेने वर्तवलेला हा अंदाज शेतकऱ्यांची धास्ती वाढवणार आहे. मात्र भारतीय वैज्ञानिकांनी याबाबत आत्ताच कोणतेही भाष्य करणे चुकीचे ठरेल असे सांगितले आहे. यामुळे आगामी दिवसात भारतात अल निनो येतो की नाही हे स्पष्ट होणार आहे.