Investment In Silver:- गेल्या कित्येक दिवसापासून जर आपण सोने आणि चांदीचे मार्केट पाहिले तर ते उच्चांकी पातळीवर असून सतत सोने चांदीमध्ये आपल्याला वाढ होतानाच दिसून येत आहे.
यामागील प्रमुख कारणे म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्वने केलेली व्याजदरातील कपात तसेच जागतिक पातळीवरील अनेक देशांमधील तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती, देशातील अनेक मध्यवर्ती बँकांनी सोन्याची केलेली मोठ्या प्रमाणावर खरेदी इत्यादी अनेक कारणे सांगता येतील.

त्यामुळे येणाऱ्या काळात देखील सोने व चांदीचे दर चढेच राहण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ञांनी वर्तवलेली आहे. गेल्या एक वर्षांमध्ये आतापर्यंत चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली असून इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या मते यावर्षी आतापर्यंत 18805 रुपयांनी चांदीच्या किमती वाढल्या असून या वर्षाच्या अखेरीस चांदी 98 हजार रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचण्याची शक्यता एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी अँड करन्सी हेड अनुज गुप्ता यांनी वर्तवली आहे.
त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी चांदीतील गुंतवणूक खूप फायद्याची ठरणार आहे. जर तुम्हाला देखील चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सिल्वर ईटीएफ हा पर्याय निवडू शकतात.त्यामुळे या लेखात आपण सिल्वर ईटीएफ बद्दल माहिती घेणार आहोत.
काय आहे नेमके सिल्वर ईटीएफ?
हे एक्सचेंज ट्रेडेड फंड असून चांदीसारखे शेअर्स खरेदी करण्याची सुविधा असून त्याला सिल्वर ईटीएफ म्हणतात. याची तुम्ही स्टॉक एक्सचेंज वर खरेदी आणि विक्री करू शकतात. सिल्वर ईटीएफचा बेंचमार्क स्पॉट सिल्व्हर किमती असल्याने तुम्ही चांदीच्या वास्तविक किमतीच्या जवळपासच्या किमतीत ते खरेदी करू शकतात.
सिल्वर ईटीएफमध्ये गुंतवणूक केली तर काय मिळतात फायदे?
1- तुम्ही कमीत कमी प्रमाणामध्ये देखील चांदीची खरेदी या माध्यमातून करू शकतात. त्यामध्ये युनिटमध्ये चांदी खरेदी करता येते. त्यामुळे कमी प्रमाणात किंवा एसआयपी द्वारे चांदी खरेदी करणे सोपे होते.
यामधील एक युनिट सिल्वर ईपीएफ ची किंमत सध्या 100 रुपयापेक्षा कमी आहे. म्हणजेच तुम्ही शंभर रुपयांपेक्षा कमी पैसे देऊन देखील चांदीत गुंतवणूक करू शकतात.
2- या पद्धतीने खरेदी केलेली चांदी ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये असते व ती डिमॅट खात्यात ठेवली जाते. याकरिता तुम्हाला वार्षिक डिमॅट शुल्क भरावे लागते. अशा प्रकारची चांदी खरेदी केल्यानंतर ती चोरी जाण्याची भीती राहत नाही.
3- सिल्वर ईटीएफ तुम्ही कोणत्याही अडचणी शिवाय पटकन खरेदी देखील करू शकतात आणि त्यांची विक्री देखील करू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे जेव्हा तुम्हाला पैशांची गरज भासेल तेव्हा तुम्ही ते विक्री करून पैसा उभा करू शकतात.
या काही सिल्वर ईटीएफने एक वर्षात दिला आहे चांगला परतावा
1-निपॉन इंडिया सिल्वर ईटीएफ– या सिल्वर ईटीएफने मागील एक वर्षात साधारणपणे 34% परतावा दिला आहे व मागील तीन वर्षांमध्ये 49% परतावा दिला आहे.
2- आयसीआयसीआय प्रुडेन्शियल सिल्वर ईटीएफ– या ईटीएफने मागील एक वर्षात 32 टक्के परतावा दिला असून मागील तीन वर्षांमध्ये 40 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
3- आदित्य बिर्ला सन लाईफ सिल्व्हर ईटीएफ– या ईटीएफने मागील एक वर्षात 32% परतावा दिला आहे तर मागील तीन वर्षातील परतावा 47% पर्यंत आहे.
4- ॲक्सिस सिल्वर ईटीएफ– या ईटीएफने मागील एक वर्षात 30 टक्के परतावा दिला आहे तर मागील तीन वर्षातील परतावा 67% पर्यंत आहे.
5- एचडीएफसी सिल्वर ईटीएफ– या ईटीएफने मागील एक वर्षात 32 टक्के परतावा दिला आहे तर मागील तीन वर्षांमध्ये 70 टक्क्यांचा परतावा दिला आहे.













