New Year Celebration 2025 In Abroad:- जीवनामध्ये जेव्हाही काही खास प्रसंग येतात तेव्हा ते प्रसंग सेलिब्रेशन करण्यासाठी बरेचजण घरापासून दूर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जातात व आयुष्यातील दररोजचा ताण तणाव जरा बाजूला ठेवून निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवतात.
जीवनातील खरा आनंद मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक जण प्रयत्न करत असतात व असे लोक नेहमी कुठलं कुठल्या पर्यटन स्थळी भेट देत असतात. अगदी जर आपण खास प्रसंगांचा विचार केला तर त्यामध्ये नवीन वर्षाचे स्वागत किंवा नवीन वर्षासाठी केले जाणारे सेलिब्रेशन हे देखील खूप महत्त्वाचे असते
व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सेलिब्रेशन करिता भारतातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देतात व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर घरापासून दूर जाऊन निसर्ग सौंदर्याचा एक प्रकारे आस्वादच घेतात. बरेच जण न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गोवा किंवा इतर ठिकाणांना पसंती देतात व त्या ठिकाणी एन्जॉय करतात.
पण तुम्हाला जर कमीत कमी खर्चामध्ये भारताच्या बाहेर म्हणजेच परदेशात न्यू इयर सेलिब्रेशन करायचे असेल तर तुमच्यासाठी आपल्या म्हणजेच भारताच्या शेजारी असलेला नेपाळ हा देश एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
महत्वाचे म्हणजे या ठिकाणी जायला तुम्हाला पासपोर्ट किंवा व्हिसाची आवश्यकता भासत नाही. तसेच खर्चाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी जायला तुम्हाला खूप जास्त पैसा खर्च करावा लागत नाही. कमीत कमी बजेटमध्ये तुम्ही नेपाळची टूर पूर्ण करू शकतात.
नेपाळला जायचे तर कसे जावे?
जर नेपाळला जायचे असेल तर तुम्ही दिल्लीवरून फ्लाईटने किंवा भारतातील इतर महत्त्वाच्या शहरांमधून फ्लाईटच्या माध्यमातून नेपाळला जाऊ शकतात. दिल्लीच्या दृष्टिकोनातून बघितले तर दिल्ली ते नेपाळची राजधानी काठमांडू अशी थेट फ्लाईट दिल्ली एअरपोर्टवरून उपलब्ध आहेत
. येथून तुम्ही काठमांडूला जाऊ शकतात. साधारणपणे 6000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचा खर्च तुम्हाला फ्लाईट तिकिटासाठी करावा लागतो. दुसरे म्हणजे दिल्लीहून तुम्ही बसने देखील नेपाळला जाऊ शकतात. यामध्ये भारत- नेपाळ मैत्री बससेवेचा लाभ घेऊन तुम्ही नेपाळला पोहोचू शकतात.
परंतु बसने प्रवास करताना तुम्हाला नेपाळला पोहोचायला दिल्लीवरून 25 ते 30 तासांचा कालावधी लागतो व तिकिटासाठी साधारणपणे तीन हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.
तसेच या ठिकाणी जाण्याकरिता व्हिसा किंवा पासपोर्ट लागत नाही. परंतु आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर भारतातील ओळखपत्र हे पुरावे म्हणून सोबत असणे खूप गरजेचे आहे.
हॉटेलमध्ये थांबाल तर किती पैसे खर्च होतील?
या ठिकाणी राहण्याचा खर्च खूपच कमी असतो असे म्हटले जाते. नेपाळ येथील हॉटेल्स अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध होतात. नेपाळमध्ये 1500 रुपये ते 5000 रुपयांपर्यंत तुम्हाला उत्तम अशा हॉटेल्स या ठिकाणी मिळू शकतात व त्या ठिकाणी तुम्ही राहू शकतात.
नेपाळला जाल तर काय पहाल?
1- पशुपतिनाथ मंदिर- नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिर हे खूप प्रसिद्ध असे मंदिर असून नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू शहरापासून साधारणपणे तीन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. पशुपतिनाथ मंदिर हे बागमती नदीच्या काठावर असून भगवान शंकरांना हे समर्पित असे मंदिर आहे.
पशुपतिनाथ मंदिर हे जगभर असे प्रसिद्ध मंदिर असून मोठ्या संख्येने हिंदू धर्माचे लोक या ठिकाणी भगवान शंकराच्या दर्शनाला येतात. त्यामुळे नेपाळच्या ट्रिपमध्ये भगवान शिवाचे दर्शन करण्यासाठी तुम्ही पशुपतिनाथ मंदिराला भेट देणे गरजेचे आहे.
2- काठमांडूसह इतर ठिकाणे- तसेच यासोबत तुम्ही नेपाळची राजधानी काठमांडू पाहू शकतात. काठमांडू पाहून झाल्यानंतर तुम्ही लुंबिनी, जनकपुर तसेच पोखरा, सीतामय्याचे जन्मस्थान,
चितवन राष्ट्रीय उद्यान, एवरेस्ट प्रदेश तसेच काठमांडू व्हॅलीसारख्या इतर अनेक सुंदर ठिकाणी भेट देऊन तुमची ट्रिप सफल बनवू शकतातच व जीवनात कधीच विसरणार नाहीत असा अनुभव या ट्रिपमधून मिळवू शकतात.