खराब झालेला सिबिल स्कोर सुधारण्यासाठी किती वेळ लागतो ? Cibil Score खराब होण्याची कारणे आणि उपाययोजना पहा….

Tejas B Shelar
Published:

Cibil Score : तुम्हीही कधी बँकेत कर्ज घेण्यासाठी गेला असाल किंवा कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. आज आपण कर्जासाठी महत्त्वाच्या अशा सिबिल स्कोरबाबत माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरेतर, बँकिंग क्षेत्रात सिबिल स्कोअर महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. जेव्हा एखादी व्यक्ती कर्जासाठी अर्ज करते, तेव्हा बँका आणि वित्तीय संस्था प्रथम त्याचा क्रेडिट स्कोअर तपासतात.

हा Cibil स्कोअर व्यक्तीची आर्थिक स्थिती कशी आहे आणि तो आपल्या कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या थकबाकीची वेळेवर परतफेड करू शकतो की नाही हे दर्शवतो. पण जर सिबिल स्कोर खराब झालेला असेल तर तो पुन्हा रिकव्हर करण्यासाठी किती वेळ लागतो, Cibil स्कोर खराब होण्याची कारणे आणि सिबिल स्कोर सुधारण्याच्या उपाययोजना याबाबत तुम्हाला माहिती आहे का? नाही अहो मग चिंता करू नका आज आपण याच साऱ्या मुद्द्यांची माहिती पाहणार आहोत.

सिबिल स्कोर किती असावा?

बँका आणि वित्तीय संस्था 750 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असणे चांगलं मानतात. ज्या लोकांचा सिबिल स्कोर 750 ते 800 दरम्यान असतो अशा लोकांना सहजतेने कर्ज मंजूर होते. अशा लोकांकडून कर्जासाठी कमी व्याज आकारले जाते. मात्र ज्या लोकांचा सिबिल स्कोर 300 ते 550 दरम्यान असतो अशा लोकांचा सिबिल स्कोर हा खराब मानला जातो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो.

सिबिल स्कोर खराब होण्याची कारणे

जर तुम्ही बँकेकडून कधीच कर्ज घेतलेले नसेल तर तुमची क्रेडिट हिस्टरी तयार झालेली नसते आणि यामुळे तुमचा सिबिल स्कोर हा खराब दिसतो.

कर्ज किंवा क्रेडिट कार्डचा ईएमआय वेळेवर भरला नाही तर सिबिल स्कोरवर परिणाम होतो.
जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची 30% पेक्षा जास्त क्रेडिट मर्यादा वापरत असाल तर याचा सुद्धा सिबिल स्कोरवर परिणाम होतो.

जर तुम्ही वारंवार कर्जासाठी अर्ज करत असाल तर यामुळे देखील तुमचा सिबिल स्कोर डाउन होऊ शकतो.
काही प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की बँकांच्या माध्यमातून ग्राहकांची चुकीची माहिती फिलअप केली जाते आणि याचा परिणाम म्हणून ग्राहकांचा सिबिल स्कोर कमी होतो.

सिबिल स्कोर सुधारण्यासाठी टिप्स

अनेक लोक वारंवार बँकेत जाऊन कर्जाची विचारणा करतात तसेच कर्जासाठी अर्ज करतात. मात्र सतत बँकेत जाऊन कर्जासाठी अर्ज करणे चुकीचे असून यामुळे तुमचा सिबिल डाऊन होऊ शकतो, यामुळे असे करू नये.

जर तुम्ही बँकेकडून कर्ज काढलेले असेल तर त्याचा हप्ता वेळेवर भरा. क्रेडिट कार्डचे बिल सुद्धा वेळेवर भरा. तुम्ही जर तुमचा ईएमआय वेळेवर भरला तर सिबिल स्कोर आपोआप सुधारतो.

जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि तुम्हाला एक लाख रुपयांची लिमिट देण्यात आलेली असेल तर तुम्ही फक्त तीस हजार रुपये वापरले पाहिजेत. म्हणजेच तुमच्या क्रेडिट लिमिट पेक्षा तुम्ही 30% इतकीच रक्कम वापरली पाहिजे.

तुम्ही ठराविक वेळेनंतर तुमचा सिबिल स्कोर चेक करत राहणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा सिबिल स्कोर ठीक आहे की नाही याची तुम्हाला कल्पना येते.

जर तुमचा सिबिल स्कोर डाउन असेल तर तुम्ही सिक्युर्ड क्रेडिट कार्ड घेतले पाहिजे आणि याच्या उपयोगातून आणि वेळेवर त्याचे बिल भरल्यास तुमचा सिबिल स्कोर पुन्हा सुधारू शकतो. सिक्युर्ड क्रेडिट कार्ड हे तुमच्या एफडीवर तुम्हाला मिळत असते.

काही लोक लोन गॅरेंटर बनतात. मात्र जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी लोन गॅरेंटर बनलात आणि त्याने कर्जाची परतफेड वेळेवर केली नाही तर तुमचा सिबिल स्कोर सुद्धा डाऊन होतो यामुळे लोन गॅरेंटर बनताना काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.

खराब झालेला सिबिल स्कोर किती दिवसांनी सुधारतो?

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार खराब झालेला सिबिल स्कोर हा एक-दोन महिन्यात किंवा तीन महिन्यात सुधारू शकत नाही. खराब झालेला सिबिल स्कोर सुधारण्यासाठी किमान सहा महिन्यांचा काळ लागतो. सहा महिने ते 12 महिन्यांच्या कालावधीत सिबिल स्कोर सुधारू शकतो. पण, जर सिबिल स्कोर फारच डाऊन असेल तर यापेक्षा अधिकचा वेळही लागू शकतो. यामुळे तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe