CM Uddhav Thackeray resign :- राज्याच्या राजकारणातील आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) संकटात सापडलं होत, अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. बहुमत चाचणी पुढे ढकलावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत होती. एकतर फ्लोअर टेस्ट आठवडाभरासाठी पुढे ढकलणे किंवा इतर बाबीवर सुनावणी लवकर घेणे, हाच समतोल साधण्याचा एकमेव मार्ग आहे असा युक्तिवाद शिवसेनेने मांडला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय. मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाहीय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले…
आज न्यायदेवतेनं निकाल दिला आहे. तो मान्य असायलाच पाहिजे. उद्या तातडीने बहुमत चाचणी करण्याचा राज्यपालांनी आदेश दिला आहे, त्या आदेशाचं पालन करण्याचा निर्णय न्यायालयानं दिला आहे. राज्यपालांनाही धन्यवाद द्यायचं आहे की आपण लोकशाहीचा मान राखलात. काहींनी तुमच्याकडे पत्र दिल्यानंतर २४ तासांच्या आत बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले. पण दीड वर्षापासून विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी तुमच्याकडे प्रलंबित आहे, तीही तातडीने अजूनही मंजूर केलीत, तर आपल्याबद्दलचा आदर द्विगुणित होईल.
मला शरद पवार आणि सोनिया गांधी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी आदित्य, अनिल परब आणि सुभाष देसाई हे केवळ चार शिवसेनेचे मंत्री होते याचं दु:ख होतंय. नामांतराचे ठराव मांडले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एका शब्दाचाही विरोध केला नाही. – उद्धव ठाकरे
सरकार म्हणून आपण काय केलं, तर सुरुवातीलाच छत्रपतींच्या रायगडाला निधी देऊन कामाला सुरुवात केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. पीकविमा योजनेचं बीड पॅटर्न करून घेतलंय – उद्धव ठाकरे
मी शिवसेना अनुभवत आलो आहे. रिक्षावाले, टपरीवाले, हातभट्टीवाले यांना शिवसेना प्रमुखांनी चांगल्या मार्गावर आणलं. माणसं मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर ज्यांनी आपल्याला मोठं केलं, त्यांनाच विसरायला लागली. ज्यांना आजपर्यंत मोठं केलं, सत्ता आपल्याकडे आल्यानंतर जे देता येणं शक्य होतं ते सगळं दिलं, ती लोकं नाराज झालो म्हणायला लागली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबईत आता बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अनेक शिवसैनिकांना नोटीस देण्यात आली आहे. कशासाठी? मला खरंच लाज वाटतेय. ज्या शिवसैनिकांनी आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला त्यांच्या रक्ताने तुम्ही मुंबईचे रस्ते लाल करणार आहात का? एवढी माणुसकी मेली. मी शिवसैनिकांना आवाहन करतो, कुणीही मध्ये येऊ नका. उद्या लोकशाहीचा पाळणा हलताना जल्लोष झाला पाहिजे. शिवसैनिकांनी रस्त्यामध्ये येवून नये. या आणि शप्पथ घ्या.
उद्या फ्लोर टेस्ट आहे. महाविकास आघाडीकडे किती आमदार आहेत? मला यामध्ये रस नाही. मी यापूर्वीच सांगितलं आहे. माझ्या विरोधात कोण आहेत यात रस नाही. पण माझ्याविरोधात एक जरी माझा माणूस असला तर मला ते नको. मला तो खेळच खेळायचा नाहीय. मला प्रामाणिकणाने वाटतं ज्यांना शिवसेनेने राजकीय जन्म दिला त्या शिवसेना प्रमुखांना मु्ख्यमंत्रीपदावरुन उतरवण्याचं पुण्य त्यांच्या नशिबात येत असेल ते येऊ द्या. कुणी अडवू नका. त्यांचा आनंद हिसकावून घेऊ नका, असं मुख्यमंत्री म्हणाले.
काँग्रेस बाहेरुन पाठिंबा द्यायला तयार होती, अशोक चव्हाण मंत्रीमंडळ बैठकीनंतर म्हणाले की आम्ही बाहेर पडतो, पण त्यांना सांगा असं वेड्यासारखं वागू नका,” असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. डोकी फक्त मोजण्यासाठी वापरायची की कामासाठी?, असा प्रश्न विचारत आपल्याला डोकी मोजण्याची इच्छा नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली. “मला तो खेळच खेळायचा नाहीय. मला प्रमाणिकपणे असं वाटतं की शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचण्याचं पुण्य मिळत असेल तर ते त्यांना मिळू द्या,” अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली.
महाविकास आघाडीला सर्वात मोठा झटका
सुप्रीम कोर्टाने आज सर्वात मोठा निर्णय दिला आहे. शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर जवळपास चार तास युक्तीवाद झाला. अखेर चार तास चालेल्या जोरदार युक्तीवादानंंतर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने उद्या बहुमत चाचणी होणारच, असा निकाल दिला आहे.
घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला असताना सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. ही एक ऐतिहासिक सुनावली मानली जात होती. अखेर सुप्रीम कोर्टाने राज्यपालांच्या निर्णयाला योग्य ठरवत बहुमत चाचणीला स्थगिती देता येणार नाही, असा निकाल दिला. त्यामुळे महाविकास आघाडीला हा सर्वात मोठा झटका आहे.
सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद’ मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळातील अखेरचं भाषण
राज्यात सत्तानाट्याला वेग आला आहे. यातच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहिले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाषण केलं. मला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद असं सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. तसंच मला माझ्याच काही लोकांनी दगा दिल्याने ही परिस्थिती उद्धभवल्याची खंत मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.
जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्याला सामोरं जाऊ, या अडीच वर्षात तुम्ही सहकार्य केलं, जर माझ्याकडून कोणाचा अपमान झाला असले कोणी दुखावले असतील तर मी माफी मागतो, असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.
गेल्या अडीच वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगलं सहकार्य केलं, पण मला माझ्याच पक्षातील लोकांनी दगा दिला, याचं दु:ख वाटतं अशी भावना मुख्यमंत्र्यानी यावेळी बोलून दाखवली. उद्या विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यानी राजीनाम्याचा सूतोवाच केल्याचं आता बोललं जात आहे.