श्रीरामपूर : राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना ही निषेधार्ह आहे. अशा दुष्ट प्रवृत्तींना तात्काळ पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा सज्जड इशारा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी दिला आहे.
काँग्रेस कमिटीच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, माजी सभापती सुरेश निमसे, सुरेश करपे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, शहराध्यक्ष कृष्णा मुसमाडे यांच्यासह अनेकजण हजर होते.

निवेदनात असे म्हटले आहे की, राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला ही घटना अत्यंत दु:खद आणि संतापजनक आहे. अशा समाजविघातकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर पोलीस प्रशासनाने हे गांभीर्याने घ्यावे.संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करावी, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, माजी पंचायत समिती सभापती सुरेश निमसे, सुरेश करपे, शहराध्यक्ष कृष्णा मुसमाडे, माजी उपनगराध्यक्ष वैभव गिरमे, शिवसेनेचे दत्ता कडू, भागवत मुंगसे, नानासाहेब कदम, उत्तमराव कडू, युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल पाटील, भाऊसाहेब गुंजाळ, अनिल कदम, विजय तोडमल, अनिल चव्हाण, राजेंद्र कदम यांच्यासह इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या परिसरातील चबुतऱ्याची दुरुस्ती आणि बंद पडलेले पथदिवे तातडीने सुरू करावेत, अशा सूचना आमदार ओगले यांनी डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकांना दिल्या आहेत.