अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- ढगाळ वातावरण आणि अधिकचा गारवा यामुळे मुख्य पीक असणाऱ्या गव्हावरही रोगराईचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळेच गव्हाबद्दल कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण सल्ला दिलेला आहे.
सुधारित वाण, योग्य खत आणि सिंचनाची व्यवस्था करून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरा केला आहे. यामधून अधिकचे उत्पन्न मिळेल हाच शेतकऱ्यांचा उद्देश राहिलेला आहे. परंतु सततच्या हवामानातील बदलांमुळे रब्बी पिकांत अनेक रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
याआधी बदलत्या वातावरणाचा परिणाम आतापर्यंत हरभरा या पिकावरच झाला होता. याबाबत कृषीतज्ञ प्रा. बी. आर कंबोज यांनी सांगितले आहे की, गव्हावर वेगाने पसरणाऱ्या तांबेरा रोगाचे वेळीच व्यवस्थापन केले नाही तर उत्पादनात मोठी घट होणार आहे.
त्यामुळे पिकाचे नुकसान होऊ नये आणि उत्पन्न चांगले होईल, यासाठी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या शिफारशी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी बुरशीनाशकाचा वापर करावा. डिसेंबरच्या अखेरीस ते मार्चच्या मध्यापर्यंत गव्हाच्या पिकात तांबेरा रोगाची लक्षणे दिसून येतात.
वाढत्या क्षेत्रामुळे या रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्रच आढळून येत आहे. शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे ओळखावा फरक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे का नाही हे ओळखण्यासाठी बार्ली विभागाचे अध्यक्ष डॉ. पवन कुमार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी तांबेरा प्रादुर्भाव झाला आहे असा गहू हातामध्ये पकडून त्याची पाने एकमेकांवर घासावित.
तेव्हा बुरशीचे कण बोटाला किंवा अंगठ्याला चिकटून हळदी सारखे दिसतात. तर पोषक तत्त्वांच्या कमतरतेत असे होत नाही. कधीकधी शेतकरी तांबेरा रोग आणि गव्हाच्या पिकातील पोषक तत्त्वांची कमतरता यांच्यातील फरक ओळखत नाहीत.
अशा वेळेस तपासणी न करताच औषधांचा मारा केला जातो. त्यामुळे आर्थिक नुकसान तर होते शिवाय पिकांवर विपरीत परिणामही. तांबेरामुळे पानांवर पिवळे किंवा संतरीपट्टे दिसतात.
कृषितज्ञ डॉ. राजेंद्रसिंग बेनीवाल यांच्या मते, शेतात तांबेरा रोगाची लक्षणे दिसू लागताच, 200 लिटर पाण्यात प्रोपकोनाझोल 200 मिली ताबडतोब मिसळून फवारणी करावी लागणार आहे.
एचडी 2967, एचडी 2851, डब्ल्यूएच 711 या वाणाच्या गव्हामध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे पेरणी करतानाच शेतकऱ्यांनी या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही त्या जातीच्या बियाणांची निवड करणे महत्वाचे आहे. या प्रकारे तांबेरा रोगावर अशी उपाययोजना करता येते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम