निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव व मार्गदर्शक ॲड राहुल झावरे यांच्यावर अहिल्या नगर येथील सुरभी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची तब्येत आता स्थिर आहे. त्यांना भेटायला येणाऱ्या हितचिंतक आणि मित्रमंडळी यांची प्रचंड मोठी संख्या आहे.
परंतु यामुळे रुग्णालयातील इतर रुग्णांच्या सेवेत व्यत्यय येत आहे. तरी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कुणीही त्यांना तुर्तास तरी भेटण्याचा आग्रह करू नये व हॉस्पिटलला येऊन गर्दी करू नये, असे आवाहन नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी केले आहे.

राहुल झावरे यांच्यावर दोन-तीन दिवसांपुर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांना अहिल्यानगर येथील सुरभी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांना भेटायला येणारे कार्यकर्ते, मित्र, सहकारी, आप्तेष्ट यांची गर्दी उसळली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हे लक्षात घेऊन लंके यांनी हे आवाहन केले आहे. दरम्यान, ते बरे झाल्यावर थोड्या ते दिवसात आपणा सर्वांना भेटतील. सर्वांच्या आशीर्वादाने , वैष्णो देवीच्या कृपाशिर्वादाने , सद्गुरू नाना महाराजांचा असणारा आशीर्वाद व चरपटिनाथ तुकाई यांची कृपा यामुळे ते उपचारांना प्रतिसाद देत असून लवकर बरे होतील असा आशावादही लंके यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राहुल झावरे यांच्यावर पारनेर येथे काहीजणांनी प्राणघातक हल्ला करुन त्यांना जबर जखमी केले होते. त्यामुळे त्यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.