पीएफ खात्यासोबत मिळतो मोफत विमा आणि कर्जासारखे अनेक फायदे! आहेत का तुम्हाला माहिती?

Benefit Of PF Account:- खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफमध्ये खाते असते. या खात्याच्या माध्यमातून कर्मचाऱ्याला अनेक प्रकारचे फायदे मिळतात आपल्याला माहित आहे की ईपीएफ खाते अंतर्गत एखाद्या कर्मचाऱ्याला आर्थिक वर्षात दीड लाख रुपयांपर्यंतच्या पीएफ योगदानावर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत आयकर सूट देखील मिळते.

इतकेच नाही तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत विमा आणि पेन्शन सुविधेचा देखील लाभ देते. त्यामुळे पीएफ सोबत मिळणाऱ्या अशाच काही फायद्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ.

पीएफ खात्यासोबत मिळतात अनेक फायदे

1- मोफत विम्याचा लाभ- पीएफ खातेधारकाचा जर त्याच्या सेवेच्या कालावधीमध्ये मृत्यू झाला तर EDLI योजनेच्या माध्यमातून सात लाख रुपयांपर्यंतच्या मोफत विम्यासाठी तो पात्र असतो. यापूर्वी पीएफ खातेदारांसाठी मृत्यू कव्हर सहा लाख रुपये होते. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून ते सात लाख रुपये करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या या विमा संरक्षणासाठी पीएफ खातेधारकाला कोणताही वेगळा विमा प्रीमियम भरण्याची गरज भासत नाही.

2- पेन्शनचा लाभ- पीएफ खातेदार त्याच्या वयाच्या 58 वर्षानंतर पेन्शनसाठी पात्र ठरतो. परंतु पेन्शन मिळवण्यासाठी पीएफ खात्यात किमान पंधरा वर्षे नियमित मासिक पीएफ योगदान असणे गरजेचे आहे.

तसेच नियोक्त्याच्या योगदानातून पेन्शनचा लाभ मिळतो. कारण 12% नियोक्त्याच्या योगदानापैकी 8.33% पीएफ खातेधारकाच्या ईपीएस खात्यात जमा होत असते.

3- कर्जाची सुविधा मिळते- कर्मचाऱ्याला पीएफमध्ये कर्जाची सुविधा देखील दिली जाते. आर्थिक संकटाच्या वेळी पीएफ खातेदार पीएफ शिल्लक रकमेवर कर्ज घेऊ शकतात. विशेष म्हणजे पीएफ कर्जावरील व्याजदर फक्त एक टक्का इतका आहे व हे कर्ज कमी कालावधीचे असते. म्हणजे या माध्यमातून कर्ज मिळाल्यानंतर 36 महिन्याच्या आतमध्ये त्याची परतफेड करावी लागते.

4- आंशिक पैसे काढण्याची सुविधा- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना काही अटी व शर्तीसह वैद्यकीय किंवा आर्थिक संकटाच्या बाबतीत खातेधारकाला आंशिक पैसे काढण्याची परवानगी देते.

5- होमलोनची परतफेड- होमलोनच्या परतफेडीसाठी कर्मचारी त्याचे पीएफ खात्याचा वापर करू शकतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमानुसार एखादा कर्मचारी त्याच्या पीएफ खात्यातील 90% रक्कम नवीन घर खरेदी करण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी वापरू शकतो. इतकेच नाही तर एखादा कर्मचारी त्याच्या पीएफ शिल्लक वापरून जमीन देखील खरेदी करू शकतो.