Domicile Certificate : शाळा, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आवश्यक डोमिसाईल सर्टिफिकेट कसं काढणार? कोणती कागदपत्रे लागतात? पहा….

Ajay Patil
Published:
Domicile Certificate

Domicile Certificate : सध्या शाळा, कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्याच्या दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर या गर्दीत आणखी वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच लागणार आहे.

बारावीचा निकाल 31 मे पर्यंत लागण्याची शक्यता असून दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

यामध्ये डोमिसाईल अर्थातच वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्राची देखील आवश्यकता असते. हे प्रमाणपत्र तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे सिद्ध करते. यामुळे हे प्रमाणपत्र ऍडमिशन घेण्यासाठी तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असते.

हे प्रमाणपत्र अनेक शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील हे प्रमाणपत्र आवश्यक असते. सामान्य जनतेसाठी देखील वेगवेगळ्या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी या कागदपत्राची अट अनेकदा घालून दिली जाते.

यामुळे हे प्रमाणपत्र कसे काढले जाते, यासाठी कोणते कागदपत्रे लागतात? किती दिवसात हे प्रमाणपत्र मिळते? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. दरम्यान आज आपण या प्रश्नाची सविस्तर उत्तर जाणून घेणार आहोत.

डोमिसाईल सर्टिफिकेट कुठं मिळते

तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी हे प्रमाणपत्र काढून मिळते.

याशिवाय आपले सरकार या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून देखील हे प्रमाणपत्र मिळवले जाऊ शकते. https://aaplesarkar.mahaonline.gov.in या सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करून हे प्रमाणपत्र मिळवता येते.

डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी आवश्यक कागदपत्रे?

ओळखीचा पुरावा म्हणून अर्जदाराचे पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान कार्ड, निमशासकीय ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, रोजगार हमी योजनेचे ओळखपत्र यापैकी कोणतेही कागदपत्र सादर केले जाऊ शकते.

पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल, रेशन कार्ड, पासपोर्ट, टेलिफोन बिल, मालमत्ता कर पावती, सातबारा उतारा, आठ अ उतारा यांसारखी कागदपत्रे सादर केली जाऊ शकतात.

वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला यांसारखे कागदपत्रे सादर केले जातात.

रहीवासाचा पुरावा म्हणून ग्रामसेवक तलाठी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतलेला रहिवासी दाखला तसेच स्वयंघोषणापत्र आवश्यक असते.

डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

यासाठी शासनाच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर नवीन वापरकर्ता आणि नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

या ठिकाणी नोंदणी करून पुन्हा लॉगिन घ्यायचे आहे.

लॉगिन घेतल्यानंतर डॅशबोर्ड वरून महसूल विभाग निवडायचा आहे.

यानंतर तेथे डोमिसाईल सर्टिफिकेट हा पर्याय निवडायचा आहे.

यानंतर तेथे विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.

यामध्ये सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.

फोटो आणि सही देखील अपलोड करावी लागेल.

यानंतर यासाठी पेमेंट देखील करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल. अर्ज सबमिट झाल्यानंतर साधारणता पंधरा दिवसात हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळून जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe