Ahmednagar News:- लोकसभा 2024 मध्ये अहमदनगर लोकसभा मतदार संघातून भाजपचे दिग्गज नेते सुजय विखे पाटील यांना पराभवाचे धूळ चारत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके विजयी झाले. निलेश लंके म्हटले म्हणजे अतिशय साधी राहणीमान असलेले हे व्यक्तिमत्व असून त्यांच्या अनेक किश्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.
पारनेर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार असताना कोरोना कालावधीत त्यांनी केलेल्या कामामुळे ते अल्पावधीत संपूर्ण राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आलेले होते. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये राहणारा हा एक नेता सर्वसामान्य कुटुंबातील असून राजकारणात मात्र एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे.

सध्या ते अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार असून जेव्हा त्यांनी पहिल्यांदा संसदेत पाऊल ठेवले तेव्हा त्यांची भेट अमित शहा यांच्यासोबत झाली व त्यांच्यासोबत त्यांनी फोटो काढला व त्यावेळेस घडलेला एक किस्सा त्यांनी नुकताच सांगितला व हा किस्सा ऐकून उपस्थित कार्यकर्ते
आणि खुद्द राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हसू आवरणे कठीण झाले. सध्या राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्या या वक्तव्याची जोरदार खमंग अशी चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे.
नेमका काय आहे तो किस्सा?
हा किस्सा सांगताना निलेश लंके यांनी म्हटले की, मला फक्त विधानसभेचा अनुभव होता व लोकसभेविषयी कधीही मला काही माहिती नव्हते. जेव्हा मी लोकसभेत पहिल्यांदाच पोहोचलो तेव्हा बिनधास्त होतो. त्यादिवशी माझ्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे, दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे आणि कल्याण काळे होते.
जेव्हा मी त्या ठिकाणी होतो तेव्हा संसदेच्या लॉबीत अमित शहा आले व यावेळी निलेश लंके यांच्यासोबत असणाऱ्या काही मंडळींनी अमित शहा यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह धरला. या सगळ्या प्रकरणात निलेश लंके यांनी पुढाकार घेतला आणि अमित शहा यांना आवाज दिला व म्हटले की साहेब आम्हाला तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे.
त्यावेळी अमित शहा यांनी देखील निलेश लंके यांना पटकन प्रतिसाद दिला व फोटो काढण्यासाठी सगळ्यांना बोलावले. यावेळी मात्र निलेश लंके यांनी सोबत असलेल्या सहकाऱ्यांची ओळख अमित शहा यांना करून दिली व ओळख करून देताना अमित शहा यांना म्हटले की, हे बजरंग आप्पा, पंकजा मुंडे यांना पाडून आले. हे भास्कर भगरे, भारती पवार यांना पाडून आले.
तर हे कल्याण काळे रावसाहेब दानवे यांना पाडून आले आहेत आणि मी निलेश लंके सुजय विखे यांना पाडून आलो आहे, अशा पद्धतीची सगळ्यांची ओळख निलेश लंके यांनी अमित शहा यांना करून दिली. जेव्हा हे वक्तव्य त्यांनी सांगितले तेव्हा मात्र सभेमध्ये एकच हशा पिकला व सगळेजण हसून लोटपोट झाले.
त्यानंतर अमित शहा यांनी काय दिली प्रतिक्रिया?
ही ओळख करून दिल्यानंतर अमित शहा निलेश लंके यांना काय बोलले हे देखील त्यांनी सांगितले. खूपच डेअरिंग आहे असे म्हणत अमित शहानी कौतुक केल्याचे देखील निलेश लंकेनी सांगितले. यानंतर आम्ही 21 लाख मतदारांमधून आलो आहोत, मागच्या दाराने थोडी आलो आहोत असे देखील निलेश लंकेने म्हटलं. निलेश लंकेच्या या वक्तव्याची चर्चा मात्र आता जोरदार रंगली आहे.