ईपीएफओ 3.0 मुळे पीएफ काढणे झाले सुपरफास्ट; काही तासांत खात्यात जमा होणार पैसे

Published on -

EPFO News : नोकरी करणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने आपल्या सेवांमध्ये ऐतिहासिक बदल करत ईपीएफओ 3.0 ही नवी डिजिटल प्रणाली लागू केली आहे.

या सुधारणांमुळे आता भविष्य निर्वाह निधी (PF) काढण्याची प्रक्रिया अत्यंत जलद, पारदर्शक आणि सोपी झाली असून, योग्य कागदपत्रे आणि ई-केवायसी पूर्ण असल्यास काही तासांतच पीएफची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे.

याआधी पीएफ क्लेम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना अनेक दिवस, कधी कधी आठवडेही प्रतीक्षा करावी लागत होती. कंपनीकडून मंजुरीला होणारा उशीर, प्रोफाइलमधील चुका, आधार किंवा बँक तपशीलातील विसंगती यामुळे क्लेम अडकून पडायचे.

मात्र, ईपीएफओ 3.0 अंतर्गत या सर्व अडचणी मोठ्या प्रमाणात दूर करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 23 जानेवारी 2026 पर्यंत 8.53 कोटींपेक्षा जास्त पीएफ क्लेम्सचा निपटारा करण्यात आला आहे. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते.

या नव्या प्रणालीतील महत्त्वाचा बदल म्हणजे फेस ऑथेंटिकेशन सिस्टम. ऑगस्ट 2025 पासून नव्या कर्मचाऱ्यांसाठी यूएएन (UAN) तयार करताना फेस ऑथेंटिकेशन बंधनकारक करण्यात आले आहे.

उमंग अॅपच्या माध्यमातून आधार आधारित फेस व्हेरिफिकेशन करून कर्मचारी स्वतःच आपला यूएएन तयार व ॲक्टिव्हेट करू शकतात. त्यामुळे एजंट, मध्यस्थ किंवा कार्यालयांवर अवलंबून राहण्याची गरज आता उरलेली नाही.

ईपीएफओ 3.0 अंतर्गत सेंट्रलाइज्ड पेन्शन सिस्टम देखील लागू करण्यात आली आहे. यामुळे पेन्शनधारकांना एका विशिष्ट बँकेत खाते असणे बंधनकारक राहिलेले नाही. देशातील कोणत्याही शेड्युल्ड बँकेतून आता पेन्शन मिळू शकणार आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच, ई-केवायसी पूर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांना आता पीएफ ट्रान्स्फरसाठी जुन्या किंवा नव्या कंपनीच्या मंजुरीची आवश्यकता राहिलेली नाही. नोकरी बदलल्यानंतर कर्मचारी थेट ऑनलाइन क्लेम फाईल करू शकतात. त्यामुळे जुन्या कंपनीशी संपर्क न होणाऱ्या किंवा अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओ 3.0 ही प्रणाली अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe