हरिणाया तर जिंकलेच आता महाराष्‍ट्रातही महायुतीचा मोठा विजय आपल्‍याला मिळवायचा आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

विकासाचे उदिष्‍ठ साध्‍य करताना समाजातील प्रत्‍येक घटकांचे कल्‍याण हाच आमचा अजेंडा आहे. हरियाणाच्‍या जनतेने विकासाला साथ देवून समाज तोडणा-या कॉग्रेसी प्रवृत्‍तीला धडा शिकविला आहे. महाविकास आघाडी राज्‍याला कमजोर करीत असून, महायुती महाराष्‍ट्राला मजबुत करण्‍याचा संकल्‍प करुन पुढे जात आहे. हरिणाया तर आपण जिंकलेच आता महाराष्‍ट्रातही महायुतीचा मोठा विजय आपल्‍याला मिळवायचा आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

शिर्डी येथील अंतरराष्‍ट्रीय विमानतळाच्‍या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे भूमिपुजन दुरदृष्‍य प्रणालीव्‍दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाले. राज्यपाल सी.पी राधाकृष्‍णन्, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार आदि नेते या कार्यक्रमास उपस्थित होते. तर शिर्डी विमानतळावर संपन्‍न झालेल्‍या कार्यक्रमास महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील, आ.आशुतोष काळे, जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालिमठ, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, शिर्डी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍यासह नागरीक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, शिर्डी विमानतळाच्‍या टर्मिनल इमारतीमुळे साईभक्‍तांना मोठ्या सुविधा मिळणार आहेत. शिर्डी नव्‍हे तर शेजारील इतर धार्मिक स्‍थळांनाही याचा लाभ होवून जिल्‍ह्यासह राज्‍याचे पर्यटन वाढेल. या विमानतळाचा शेतक-यांनाही कृषि माल विदेशात पाठविण्‍यासाठी उपयोग होवून कृषि मालाची निर्यात करण्‍याची संधी मिळणार असल्‍याचे सांगून पंतप्रधान म्‍हणाले की, विरासत आणि विकास हा दृष्‍टीकोन ठेवून शेतकरी, गरीब, मजुर, उद्योजक यांच्‍या कल्‍याणासाठी आम्‍ही काम करीत असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन सांगितले.

हरियाणा मध्‍ये मिळालेल्‍या विजयाचा उल्‍लेख करुन, पंतप्रधान मोदी म्‍हणाले की, हरियाणाच्‍या जनतेने विकास कार्याला साथ दिली आहे. कॉग्रेसने फक्‍त तेथील जनतेला भडकावण्‍याचे काम केले. शेतक-यांचीही दिशाभूल केली. पण शेतक-यांना हमीभाव कोणी दिला हे माहीत होते. त्‍यांनी युवकांनाही लक्ष करुन भडकावले असले तरी, हरियाणातील जनतेचा भाजपावरच भरवसा होता हे निकालातून दिसूल आले. अर्बन नक्षलवादाच्‍या षडयंत्राचे शिकार आम्‍हाला व्‍हायचे नाही हे हरियाणातील जनतेने पक्‍के ठरवून भाजपाच्‍या बाजून आपला कौल दिला अशा शब्‍दात त्‍यांनी या निकालाचे विष्लेशन केले.

कॉग्रेसने आजपर्यंत देशाचे विभाजन करुन, सत्‍ता मिळविण्‍याचे काम केले. यासाठी त्‍यांनी खोटे नॅरेटीव्‍ह पसरवून जनतेला गुमराह करण्‍याचा प्रयत्‍न केला. मुस्लिम समाजाचा केवळ व्‍होटबॅकेंसाठी उपयोग केला. मात्र मुस्लिम समाजामध्‍ये किती जाती आहेत असा प्रश्‍न विचारला तर, कॉग्रेस नेत्‍यांच्‍या तोंडाला कुलूप लागते. मात्र हिंदु समाजाबद्दल जेव्‍हा चर्चा सुरु होते त्‍यांना कॉंग्रेसवाल्‍यांना जातीवाद आठवतो. यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्‍याचे काम कॉंग्रेसने आजपर्यंत केले असल्‍याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्‍या भाषणात केला.

केंद्र सरकारने शेतक-यांसाठी महत्‍वपूर्ण निर्णय घेतले असून, बासमती तांदुळ आणि कांद्यावरील निर्यात बंदी पुर्णपणे उठविली आहे. देशामध्‍ये आयात होणा-या तेलावर २० टक्‍के शुल्‍क लावण्‍यात आले असून, उत्‍पादीत मालाचा शेक-यांनाच लाभ व्‍हावा हाच आमचा प्रयत्‍न आहे. शेतक-यांना मदत करण्‍यासाठी राज्‍यात प्रकल्‍प उभे राहत असून, आमची निती ही विकसीत भारताची आहे. आमचे व्‍हीजन हे समाजाच्‍या कल्‍याणाचे असल्‍याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

याप्रसंगी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांचीही भाषण झाली. याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी अहिल्‍यानगर जिल्‍ह्यासह या विभागाच्‍या दृष्‍टीने मोठी उपलब्‍धी या टर्मिनल इमारतीमुळे होणार आहे. केवळ शि‍र्डीच्‍या अध्‍यात्मिक नगरला नाही तर भविष्‍यात होणा-या औद्योगिक वसाहतीच्‍या दृष्‍टीनेही हे विमानतळ आता आर्थिक प्रगतीचे मुख्य केंद्र ठरणार असल्‍याचे सांगून या विमानतळाला श्री.साईबाबा अंतरराष्‍ट्रीय विमानतळ या नावाने ओळखले जावे व त्‍याची कार्यवाही करण्‍याची विनंती त्‍यांनी आपल्‍या भाषणात केली.