Farmer Success Story : सोयाबीन लागवडीचा प्रयोग यशस्वी ! एका झाडाला लगडल्या 500 सोयाबीनच्या शेंगा

Ajay Patil
Published:

Farmer Success Story :- प्रयोगशीलता हा गुण खूप महत्त्वपूर्ण असून कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रयोगशीलता हा गुण असणारे व्यक्ती कायमच यशस्वी ठरतात व त्यांच्या या प्रयोगशील वृत्तीमुळे किंवा गुणामुळे अनेक नवनवीन गोष्टी घडत असतात.

जगामध्ये जे काही शोध लागलेत त्यामागे प्रयोगशीलता हाच गुण आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या मुद्द्याला कृषी क्षेत्र देखील अपवाद नाही. शेतीमध्ये देखील अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतात. अशा प्रकारचे प्रयोग हे नवनवीन पीक पद्धती, पिकांचे नवनवीन वाण विकसित करणे,

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रयोग शेतकरी करत असतात. तसेच बरेच शेतकरी असे दिसून येतात की ते शेतीसंबंधी महत्त्वाची माहिती अनेक माध्यमातून मिळवत असतात व इतर यशस्वी शेतकऱ्यांचे अनुकरण करून बऱ्याच गोष्टींचा अवलंब स्वतःच्या शेतीमध्ये करतात.

याच सगळ्या मुद्द्याला धरून जर आपण विचार केला तर बदनापूर तालुक्यातील काजळा या गावचे अशोक पांढरे हे प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी परदेशी बाजरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला व त्या पाठोपाठ परदेशी सोयाबीन लागवडीचा प्रयोग देखील यशस्वी करून दाखवला आहे. नेमका हा प्रयोग त्यांनी कशा पद्धतीने यशस्वी केला याबद्दलची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

अशोक पांढरे यांनी परदेशी सोयाबीन लागवडीचा प्रयोग केला यशस्वी

याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की, बदनापूर तालुक्यातील काजळा या गावचे शेतकरी अशोक पांढरे यांनी परदेशी सोयाबीन लागवडीचा प्रयोग यशस्वी केला असून त्यांच्या या सोयाबीनच्या एका झाडाला पाचशे शेंगा लागले आहेत.

तसेच या अगोदर त्यांनी तुर्की बाजरीचा प्रयोग यशस्वी केला होता व या माध्यमातून देखील त्यांना 30 क्विंटल बाजरीचे उत्पादन मिळाले होते. या बाजरीचे कणीस हे चक्क तीन ते साडेतीन फूट उंच होते. फक्त दहावीपर्यंत शिक्षण झालेले अशोक पांढरे हे शेतीमधील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी कायम खूप उत्सुक असतात व त्याकरिता ते सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारची माहिती मिळवत असतात व कृषीशी संबंधित प्रदर्शने तसेच महोत्सवना देखील ते भेटी देतात.

या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा प्रयोग ते स्वतःच्या शेतात करून पाहतात. अगदी याच पद्धतीने सिल्लोड या ठिकाणी जो काही कृषी महोत्सव झाला होता त्या महोत्सवामध्ये त्यांना विक्रमी उत्पादन देणाऱ्या अमेरिकेचे वाण अजब गजब नावाच्या सोयाबीन वाणाची माहिती झालेली होती व त्या सोयाबीन उत्पादनाचा व्हिडिओ देखील त्यांनी पाहिलेला होता.

त्या अनुषंगाने त्यांनी या बियाणे बाबतीत अनेक ठिकाणी चौकशी केली. त्यानंतर मंठा तालुक्यातील किर्ला येथील शेतकरी परमेश्वर बाडगे यांनी अमेरिकन सोयाबीनचे वाण मागवले होते व त्यांनी या वानाची लागवड करून तब्बल तीन पट अधिकचे उत्पादन मिळवले होते. बाडगे यांनी हे सोयाबीनचे बियाणे दुसऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना देखील विकले होते. त्यांच्याकडून अशोक पांढरे यांनी मागच्या वर्षी एक किलो अमेरिकन सोयाबीनचे वाण विकत घेतले व दोन गुंठ्यात सोयाबीन ची लागवड केली होती.

दोन गुंठ्यात त्यांना एक क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले व हेच वाण त्यांनी पुढच्या लागवडीकरिता स्वतःच्या शेतात वापरण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून त्यांनी आठ एकरामध्ये अमेरिकन सोयाबीनची एक जुलै रोजी लागवड केली. यावर्षी पावसाचे प्रमाण अगदी कमी असल्यामुळे सोयाबीन पिकाचे बऱ्याच ठिकाणी नुकसान झाले व पिकाची वाढच खुंटलेली आहे. तसेच यावर्षी सोयाबीनच्या पिकाला असणाऱ्या शेंगांची संख्या देखील लक्षणियरीत्या कमी झालेली आहे.

परंतु अशोक पांढरे यांच्या शेतातील सोयाबीनची झाडे शेंगांनी बहरून गेलेली असून एका झाडाला आता ते आठ फांद्या असून एका फांदीला 40 ते 50 शेंगा लागलेल्या आहेत. झाडाच्या बुडापासून ते शेंडापर्यंत शेंगाच शेंगा लागल्या असून बऱ्याच शेंगा या चारदाणी आहेत.

मागच्या वर्षी एका एकर मध्ये सोयाबीनच्या लागवडीतून त्यांना नऊ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले होते व यंदा आठ एकर मध्ये त्यांनी अमेरिकन सोयाबीनचे एकरी 24 क्विंटल उत्पादन होईल अशी अपेक्षा त्यांना आहे.

अशा पद्धतीने जर शेतीमध्ये वेगवेगळी माहिती घेऊन तसेच वेगवेगळे प्रयोग करून जर शेती केली तर नक्कीच उत्पादनात दुप्पट वाढ होऊ शकते हे अशोक पांढरे यांच्या उदाहरणावरून दिसून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe