Farmer Land Acquisition : राज्यातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था विशेषतः रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी शासनाकडून रस्त्यांची कामे केली जातात. पंतप्रधान ग्राम सडक योजना असो किंवा मग मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात पक्के रस्ते तयार केले जातात.
यासाठी जमीन अधिग्रहित केल्या जातात आणि अधिग्रहित जमिनीच्या मोबदल्यात संबंधित जमीनदारांना नुकसान भरपाई दिली जाते. मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथील एका शेतकऱ्याला त्याच्या शेतजमीनीतून पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता गेला तरी देखील मोबदला मिळाला नाही. प्रकाश नाकतोडे असे या शेतकऱ्याचे नाव.

मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी हताश झाला आणि मग त्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. अगदी शोले स्टाईल आंदोलन त्याने केले. पाण्याच्या टाकीवर चढून या बाधित शेतकऱ्याने तब्बल सात तास आंदोलन सुरू ठेवले. यामुळे सध्या महाराष्ट्रात या शोले स्टाईल आंदोलनाची मोठी चर्चा रंगली आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, प्रकाश नागतोडे यांच्या जमिनीतून पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत पक्क्या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या जमिनीतून हा रस्ता केला आहे तो त्यांच्या सासूबाईंच्या नावे आहे. मात्र पक्का रस्ता तयार होऊनही त्यांना मोबदला मिळाला नसल्याने हताश प्रकाश रावांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं.
गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शेतीच्या नुकसानीचा आणि भूसंपादनाचा आर्थिक मोबदला मिळावा यासाठी त्यांनी आंदोलन केलं. विशेष म्हणजे पाण्याच्या टाकीवर चढूनही प्रशासकांनी त्यांच्या मागण्या मान्य न केल्याने त्यांनी केरोसीन टाकून आत्मदहनाचा प्रयत्न यावेळी केला. यामुळे पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची एकच तारांबळ उडाली.
शेवटी या एका शेतकऱ्याच्या आंदोलनाचा धसका संपूर्ण प्रशासनाला बसला. प्रकाश यांच्या मोबदल्याच्या मागणीचा प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय झाला आणि चक्क 1,000 रुपयाच्या स्टॅम्पवर अधिकाऱ्यांनी प्रकाश नाकतोडे यांना मोबदला देण्याचे लिहून दिले.
मोबदला मिळेल हे एक हजार रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून मिळाल्यानंतर प्रकाश यांनी जवळपास सात तासांचे आंदोलन संपवले. प्रकाशाने आंदोलन मागे घेतल्याने पोलीस प्रशासन समवेतच ग्रामस्तानी देखील सुटकेचा निःश्वास घेतला