Farmer News : बदलत्या काळात केवळ शहरातील नोकरी म्हणजेच यश असे समीकरण राहिलेले नाही, हे आज अनेक तरुण आपल्या कृतीतून दाखवून देत आहेत. उच्चशिक्षित असूनही आरामदायी नोकरीला रामराम ठोकत शेती, पशुपालन आणि ग्रामीण उद्योगांकडे वळणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे.
अशाच एका प्रेरणादायी कहाणीचे केंद्रबिंदू आहेत उत्तराखंडमधील डेहराडून येथील हरिओम नौटियाल. खासगी कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी दुग्ध व्यवसायात उडी घेतली आणि आज त्यांचा व्यवसाय वार्षिक दोन कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे.

उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर हरिओम नौटियाल एका नामांकित खासगी कंपनीत कार्यरत होते. आर्थिक स्थैर्य असूनही नोकरीतील एकसुरीपणा, मर्यादित स्वातंत्र्य आणि स्वतः काहीतरी उभे करण्याची इच्छा यामुळे त्यांनी उद्योजकतेचा मार्ग निवडला. हा निर्णय घेताना कुटुंबीयांसह अनेकांनी विरोध केला, मात्र त्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहून गावाकडे परतण्याचा धाडसी निर्णय घेतला.
गावी परतल्यानंतर हरिओम यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला अवघ्या दहा गायींपासून त्यांनी हा प्रवास सुरू केला. पहिल्या टप्प्यात दूध विक्रीसाठी बाजारपेठेचा अभाव, दरातील चढ-उतार, वाहतुकीच्या अडचणी अशा अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागले. मात्र चिकाटी, नियोजन आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी या अडचणींवर मात केली.
२०१६ साली हरिओम यांनी दूध संकलन केंद्राची स्थापना केली. या निर्णयामुळे त्यांच्या व्यवसायाला नवे बळ मिळाले. स्थानिक शेतकरी आणि पशुपालक थेट त्यांच्या केंद्राशी जोडले गेले. दूध संकलन, प्रक्रिया आणि विक्री यांची साखळी उभी राहिल्याने नफा वाढला आणि व्यवसायाचा विस्तार झाला.
‘धान्य धेनू’ या नावाने ओळख निर्माण केलेल्या या उपक्रमात गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. शुद्ध, ताजे आणि भेसळमुक्त दूध पुरवण्यामुळे ग्राहकांचा मोठा विश्वास मिळाला. आज डेहराडून आणि ऋषिकेश परिसरात दररोज सुमारे २५० लिटर दूध विक्री होते.
दुग्ध व्यवसायाबरोबरच मावा, आईस्क्रीम, रबडी, फालूदा आणि घरगुती लोणची अशा विविध उत्पादनांमुळे त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल दोन कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
विशेष म्हणजे या उपक्रमातून १५ गावांतील सुमारे ५०० लोकांना थेट व अप्रत्यक्ष रोजगार मिळत असून, हरिओम नौटियाल आज ग्रामीण उद्योजकतेचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत.













