कष्टाचं चीज झालं म्हणायचं ! पारंपारिक पिकांना राम-राम ठोकला अन ‘या’ फळबागेतून साधली आर्थिक प्रगती; 2 एकरात झाली 19 लाखांची कमाई

Ajay Patil
Published:
farmer success story

Farmer Success Story : विदर्भ म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहत ते शेतकरी आत्महत्येचं हृदय विदारक चित्र. स्वतःला कृषी प्रधान म्हणवून घेणाऱ्या या देशात शेतकरी आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस आकाशाला गवसनि घालत आहे. विशेषतः महाराष्ट्रात आणि त्याहूनही विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे ही समुच्चा महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.

निश्चितच शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शासनाकडून तसेच समाजातील सर्वच घटकांकडून एकत्रितपणे कार्य करण्याची गरज आहे. दरम्यान आता विदर्भातील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाची कास धरायला सुरुवात केली असून शेतकरी बांधव आता नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायातून चांगली कमाई करत आहेत.

विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्यांनी देखील काळाच्या ओघात बदल करत अन पारंपारिक पिकांना बगल देत संत्रा या फळपिकातून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे. जिल्ह्यातील मौजे वनोजा येथील पुरुषोत्तम राऊत यांनी ही किमया साधली आहे. वास्तविक पुरुषोत्तम राऊत पूर्वी इतर शेतकऱ्यांप्रमाणेच पारंपारिक पिकांची लागवड करत असतात. मात्र पारंपारिक पिकांच्या शेतीत त्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नव्हतं.

या अनुषंगाने त्यांनी सात वर्षांपूर्वी आपल्या दोन एकर शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करायचा आणि पारंपारिक पिकांची शेती करायची नाही, नवीन नगदी आणि फळबाग पिकाची लागवड करायची असा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर त्यांनी विदर्भाच्या मातीतलं पीक म्हणजेच संत्रा पिकाची लागवड केली. विदर्भासाठी हे पीक निश्चितच नवख नाही. विशेषतः नागपूर व आजूबाजूच्या परिसरात या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते. वाशिम जिल्ह्यात त्या तुलनेने कमी शेती संत्रा पिकाची होत असली तरीदेखील काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी अलीकडे संत्रा लागवडीत आपलं नशीब आजमावलं असून यामध्ये यशस्वी झाले आहेत.

पुरुषोत्तम यांनी आपल्या दोन एकर शेत जमिनीत संत्रा लागवडीचा निर्णय घेतला या अनुषंगाने संत्र्याच्या चांगल्या प्रगत वाणाची निवड करण्यात आली. जंबेरी या जातीची त्यांनी निवड केली आणि दोन एकरात वीस बाय 12 या अंतरावर संत्रा रोपे लागवड करण्यात आली. खरं पाहता पुरुषोत्तम यांच्याकडे पाण्याचा उपलब्धता खूपच कमी आहे. मात्र जिद्द आणि नियोजन यांची सांगड घालत पुरुषोत्तम यांनी संत्र्याची बाग यशस्वीरित्या फुलवली असून आता यातून त्यांना उत्पादन मिळत आहे. बाग एवढी चांगली फुलली आहे की व्यापाऱ्यांनी त्यांच्या शेताकडे आपोहून आपला मोर्चा वळवत 700 रुपये प्रति कॅरेट याप्रमाणे मालाची खरेदी केली आहे.

सध्या स्थितीला मालाची तोडणी सुरू असून आत्तापर्यंत एक हजार पाचशे कॅरेट माल उतरला आहे. अजून 1300 कॅरेट संत्र्याचे उत्पादन त्यांना होणार आहे. म्हणजेच एकूण 2800 कॅरेट संत्रा उत्पादन त्यांना या दोन एकराच्या बागेतून मिळणार आहे. अशा पद्धतीने दोन एकरात 19 लाखांपर्यंतची कमाई सर्व काही सुरळीत राहील तर त्यांना होणार आहे. विशेष म्हणजे संत्रा लागवड केल्यानंतर चौथ्या वर्षांपासून त्यांना उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आणि पहिल्याच वर्षी संत्रा बागेतून 13 लाखापेक्षा अधिक ची कमाई झाली. गेल्या वर्षी मात्र पाण्याचा शॉर्टेज आणि योग्य नियोजन बागेची होऊ शकले नाही यामुळे उत्पादनात घट झाली तरी देखील त्यांना दोन एकरातून साडेतीन लाखांची कमाई झाली.

दरम्यान यावर्षी 19 लाखांची बंपर कमाई होण्यासाठी पूरक परिस्थिती असून दहा लाखाहून अधिकची कमाई त्यांना आत्तापर्यंत झाली आहे. निश्चितच, विदर्भाच्या मातीत करण्यात आलेला हा प्रयोग विदर्भ केवळ शेतकरी आत्महत्येसाठी चर्चेला जातो असं नाही तर या मातीत असेही शेतकरी रत्न आहेत जे आपल्या प्रयोगाच्या जोरावर अख्या महाराष्ट्राला मार्गदर्शन करतात हेच सिद्ध करत आहे. त्यामुळे राज्यात कितीही मोठमोठे प्रयोग झाले असतील, शेतकऱ्यांनी करोडो रुपये कमावले असतील मात्र पुरुषोत्तम यांनी विदर्भातील मातीत, वऱ्हाडी बोलीत साकारलेला हा प्रयोग त्या इतर शेतकऱ्यांच्या प्रयोगापेक्षा खूपच वेगळा आहे अशी भावना आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe