Farmer Success Story : अलीकडे शेतीमध्ये वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. शेतकरी बांधव आता फक्त पारंपारिक पिकांची शेती करत आहेत असं नाही तर आता शेतीमध्ये वेगवेगळ्या हंगामी फळपिकांची तसेच भाजीपाला पिकांची देखील मोठ्या प्रमाणात शेती होऊ लागली आहे. विशेष म्हणजे हंगामी पिकांच्या शेतीतून शेतकऱ्यांना अल्प कालावधीत अधिक उत्पन्न मिळत आहे.
यामध्ये कलिंगड या पिकाचा देखील समावेश आहे. अलीकडे या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे. वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील कलिंगड पिकाच्या शेतीतून अल्पावधीतच लाखों रुपयांची कमाई करून दाखवली आहे. जिल्ह्यातील पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर पंडित दंडे या युवा शेतकऱ्याने आपल्या तीस गुंठ्यात कलिंगड पिकाची लागवड केली आहे.
ज्ञानेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कलिंगड लागवडीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी आपल्या ३० गुंठे शेत जमिनीवर डिसेंबर महिन्यात याची लागवड केली. डिसेंबर 2022 महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टरबूज पिकाची लागवड केल्यानंतर पिकाची योग्य पद्धतीने जोपासना करण्यात आली. यामुळे पिकाची चांगली वाढ झाली असून पीक आता चांगले बहरले आहे.
ज्ञानेश्वर यांना आत्तापर्यंत टरबूज पिकासाठी ३० ते ३५ हजार रुपये लागवड खर्च लागला आहे. सद्यस्थितीला त्यांचे पीक वाढीच्या अवस्थेत असून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी पर्यंत २० ते ३० टन उत्पादन मिळणार असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यांना देखील दर्जेदार उत्पादन मिळेल अशी आशा असून किमान १० रुपये किलोचा जरी दर मिळाला, तरी दोन ते तीन लाख रुपयाचे उत्पन्न त्यांना या पिकातून मिळणार आहे.
साहजिकचं लागवड खर्च वजा केला तरीही या नवयुवक शेतकऱ्याला दोन ते सव्वा दोन लाख रुपये निव्वळ नफा मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्ञानेश्वर यांनी केलेला हा कलिंगड लागवडीचा प्रयोग वाशिम पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड यांनीही पाहिला असून त्यांनी ज्ञानेश्वरी यांना यावेळी मार्गदर्शन देखील केले आहे. निश्चितच या तरुण शेतकऱ्याचा कलिंगड या हंगामी पिकाच्या लागवडीचा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.