Farmer Success Story : भारत हा एक कृषीप्रधान देश. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेती क्षेत्रावर आधारित. मात्र तरीही देशातील शेतकऱ्यांना शेती करतांना नानाविध संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच शासनाच्या उदासीन धोरणामुळे आणि बाजारात शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल असे उत्पन्न शेतीतून मिळत आहे.
यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत. यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. निश्चितच शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय आहे. मात्र असे असले तरी राज्यात अलीकडे शेतकऱ्यांकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.
विशेष म्हणजे या नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकरी बंधूंनी देखील असाच काहीसा प्रयोग केला आहे. तालुक्यातील मौजे बरंजळा साबळे येथील प्रयोगशील शेतकरी कृष्णा साबळे व संदीप साबळे या शेतकरी बंधूंनी अद्रक लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. या दोन्ही बंधूंनी आपल्या अथक प्रयत्नांच्या आणि कष्टाच्या जोरावर खडकाळ माळरानावर अद्रक शेती यशस्वी केली आहे.
यामुळे या प्रयोगशील शेतकऱ्यांची सध्या चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या साबळे बंधूंनी आपल्या अर्ध्या एकर शेतजमिनीत अद्रकची लागवड करून तब्बल 107 क्विंटल उत्पादन मिळवत साडेतीन लाखांचीं कमाई केली आहे. साबळे यांच्याकडे दहा एकर शेत जमीन आहे. विशेष म्हणजे दोन्ही साबळे बंधूं सुशिक्षित असून कृष्णा साबळे यांनी कॉमर्समधून पदवी ग्रहण केली आहे तर संदीप हे बॅचलर ऑफ आर्ट्स मधून पदवीचे शिक्षण घेत आहेत. मात्र असे असले तरी या दोन्ही बंधूंनी नोकरी ऐवजी शेतीलाच प्राधान्य दिले आहे.
शिक्षणासोबतच या दोन्ही बंधूंनी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. चार महिन्यांपूर्वी एका एकरात त्यांनी मिरचीचे देखील शेती केली होती. विशेष म्हणजे यातून त्यांना साडेचार लाखांची कमाई झाली. यानंतर मग अद्रक लागवड आपल्या अर्ध्या एकर जमिनीत केली आणि सात महिन्यात या पिकातून त्यांना साडेतीन लाखांची कमाई झाली आहे.
अद्रक पिकासाठी त्यांना पन्नास हजार रुपये उत्पादन खर्च आला असून तीन लाखांचा नफा या ठिकाणी त्यांना मिळाला आहे. निश्चितच साबळे बंधूंनी शेतीमध्ये केलेला हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे. शेतीमध्ये जरी वेगवेगळी संकटे आलीत तरी वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतीला फायद्याचा व्यवसाय सिद्ध केला जाऊ शकतो हेच साबळे बंधूंनी दाखवून दिले आहे.