भले शाब्बास ! शेतकरी बनणार आता कृषी ड्रोनचे पायलट ; ‘या’ ठिकाणी दिले जाणार प्रशिक्षण, ड्रोन खरेदीसाठीही मिळणार 5 लाख

Ajay Patil
Published:

Farming Drone Pilot : भारतीय कृषी क्षेत्रात काळाच्या ओघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. नावीन्यपूर्ण अशा आधुनिक यंत्राच्या आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय कृषी क्षेत्र अतिशय हायटेक बनला आहे. आतापर्यंत शेतकरी बांधवांना पिकावर फवारणी करण्यासाठी पाठीवरील चार्जिंग पंप, डिझेल चलित फवारणी पंपांचा वापर करावा लागत होता.

मात्र आता हे दिवस आठवणीत जमा होणार आहेत. कारण की आता शेतकऱ्यांना फवारणी करण्यासाठी ड्रोन चा वापर करता येणे शक्य होणार. विशेष म्हणजे यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देखील शासनाकडून दिले जाणार आहे. त्यासाठी काही संस्थांना शासनाकडून परवानगी देण्यात आलेली आहे.

या संबंधित पात्र संस्थेत प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना एक प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. मात्र प्रशिक्षण घेणारा शेतकरी हा निदान दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे केवळ शेतकरीच या प्रशिक्षणाचा भाग बनू शकतात किंवा लाभ घेऊ शकतात असे नाही तर कोणीही युवक याचा लाभ घेऊ शकतो आणि स्वतःसाठी स्वयंरोजगार मिळू शकणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कृषी ड्रोन चालवण्यासाठी आर पी सी अर्थातच रिमोट पायलट सर्टिफिकेट प्राप्त केल्यानंतर संबंधित सर्टिफिकेट धारक व्यक्तीला ड्रोन व्यावसायिकपणे चालवता येणार आहे. खरं पाहता पिकावर फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांचा अधिक वेळ खर्च होतो. शिवाय त्यामुळे शेतकरी बांधवांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. कीटकनाशकांची फवारणी करताना अनेकदा शेतकऱ्यांच्या आरोग्यास हानी पोहोचत असते.

विशेष म्हणजे कीटकनाशकांचा तसेच इतर विद्राव्य खतांचा पारंपारिक पद्धतीने फवारणी करताना अपव्यय होत असतो परिणामी उत्पादन खर्चात वाढ होते. अशा परिस्थितीत कृषी ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केल्यास शेतकऱ्यांचा वेळ वाचेल, शेतकऱ्यांचा पैसा वाचेल, सर्वात महत्त्वाच म्हणजे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात जाणार नाही.

सध्या बाजारात 25 किलो वजनाचे ड्रोन उपलब्ध असून त्यामध्ये दहा लिटर औषधसाठी ड्रम बसविण्यात आले आहेत. खरं पाहता कृषी ड्रोन वापरण्याचे फायदे खूप आहेत मात्र याचे दामदेखील तेवढेच तगडे आहेत. अशा परिस्थितीत स्वस्तात कृषी ड्रोन शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे या अनुषंगाने शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. शासनाकडून पाच लाखांपर्यंतची सबसिडी देखील कृषी ड्रोन खरेदीवर दिली जात आहे.

या संस्थांना दिली आहे परवानगी

अकॅडमी ऑफ करिअर व्हिएशन (पुणे)

पीबीसीज एरो हब पुणे

रेडवर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी बारामती

आदिसा ड्रोना (कोल्हापूर)

ड्रोन आचार्य एरिअल इनोव्हेशन्स,

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी),

बॉम्बे फ्लाइंग क्लब (मुंबई)

तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (उस्मानाबाद)

या संस्थांना राज्यात ड्रोन प्रशिक्षण देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. निश्चितच जे शेतकरी बांधव ड्रोन पायलट बनण्यासाठी किंवा इतर नवयुवक ड्रोन पायलट बनण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी या संस्थेत संपर्क साधून ड्रोन पायलेट बनून एक स्वयंरोजगार निर्माण केला तर त्यांच्यासाठी आर्थिक फायद्याची ही गोष्ट राहणार आहे.

कृषी ड्रोनचा कशासाठी वापर केला जातो बरं ?

आम्ही इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो कृषी ड्रोनचा वापर हा केवळ फवारणीसाठी होत नाही. तर पर्यावरणाचे सर्वेक्षण करण्यासाठी, शेतात कीड लागली का?, एरिया मॅपिंग, पीक मॉनिटरिंग आदी कामांसाठी देखील होत असतो. याशिवाय इतरही अद्ययावत सुविधा ड्रोन मध्ये भविष्यात उपलब्ध होणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe