Green Energy Shares:- वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सध्या सरकारच्या माध्यमातून कार्बन उत्सर्जन कमी करण्याकरिता व संभाव्य हवामान बदलाच्या धोक्याचा सामना करता यावा याकरिता नवीन धोरणे राबविण्यात येत आहेत. तसेच सौरऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत व त्यामुळे देशामध्ये नवीकरणीय ऊर्जेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
त्यामुळे या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये ज्या कंपन्या काम करतात त्यांचा व्यवसाय देखील आता वेगाने वाढताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे जर या क्षेत्रातील कंपन्यांचा व्यवसाय वाढला तर या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा नफा वाढेल हे देखील तेवढेच सत्य आहे.

त्यामुळे येणाऱ्या कालावधीत ग्रीन एनर्जी कंपन्यांच्या शेअर्समधील गुंतवणूक ही चांगला नफा देऊ शकते. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण अशा काही ग्रीन एनर्जी कंपन्यांच्या शेअरची यादी बघणार आहोत त्यामध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवता येणे शक्य आहे.
ग्रीन एनर्जी क्षेत्रातील या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना करतील मालामाल
1- एनएचपीसी(NHPC)- जर आपण या कंपनीचा विचार केला तर ही एक जलविद्युत क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असून ही कंपनी जलविद्युत प्रकल्प चालवते व ऊर्जा उत्पादन करते. सध्या या कंपनीची जलविद्युत ऊर्जा उत्पादन क्षमता 6434 मेगावॅट असून सध्या देशामध्ये या कंपनीचे आठ ठिकाणी वीज प्रकल्प आहेत. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप एक लाख 3 हजार 665 कोटी रुपये असून सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 103.20 रुपये आहे.
2- अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड– ही कंपनी सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा उत्पादक कंपनी असून या दोन्ही प्रकारे कंपनीची ऊर्जा उत्पादन क्षमता 20434 मेगावॅट आहे. भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप म्हणजेच बाजार भांडवल दोन लाख 95 हजार तीनशे तीन कोटी रुपये आहे व या कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 1864.25 रुपये आहे.
3- सुझलॉन एनर्जी– ही कंपनी प्रामुख्याने पवनचक्की निर्मितीचे काम करते व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या कंपनीचे प्रकल्प भारतातच नाही तर इतर 17 देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बिजनेस करतात. या कंपनीचे बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅप 67 हजार 252 कोटी रुपये आहे व सध्या या कंपनीच्या एका शेअरची किंमत 49.90 रुपये आहे.
4-SJVN लिमिटेड– ही कंपनी पवन ऊर्जा तसेच सौर ऊर्जा व त्यासोबत जलविद्युत क्षेत्रामध्ये कार्यरत असून या तीनही माध्यमातून ऊर्जेचे उत्पादन करते. या कंपनीची ऊर्जा निर्मिती क्षमता 2227 मेगावॅट असून या कंपनीचे मार्केट कॅप 52 हजार 345 कोटी रुपये आहे. सध्या या कंपनीच्या एका शेअरची किंमत 133.35 रुपये आहे.
5- इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड अर्थात आयआरइडीए– ही कंपनी अक्षय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित जे काही प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांची देखभाल आणि असे प्रकल्प कार्यरत राहण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत देत असते. या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 48 हजार 608 कोटी रुपये आहे व या कंपनीच्या शेअरची किंमत 180.90 रुपये इतकी आहे.
( टीप– ही माहिती वाचकांसाठी केवळ माहितीस्तव सादर केलेली आहे. हा कुठल्याही प्रकारचा शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला किंवा टिप्स नाही.)