Havaman Andaj 2026 : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पुढील काही दिवस कडाक्याची थंडी कायम राहणार आहे. महाराष्ट्रात सुद्धा थंडीची तीव्रता गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे.
मागे मुंबईत पाऊस झाला होता तर नंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळाले यामुळे काही भागात थंडीची तीव्रता थोडी कमी झाली पण आता पुन्हा एकदा हळूहळू सगळीकडे कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे.

दरम्यान आठ जानेवारी रोजी उत्तर भारतात हाडे गोठवणारी थंडी अनुभवायला मिळणार असा अंदाज समोर आला आहे तर दुसरीकडे दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये धो धो पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ऐन हिवाळ्यात दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला असल्याने तेथील शेतकऱ्यांची नक्कीच चिंता वाढणार आहे. त्याच वेळी, राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये सकाळी दाट धुक्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. अशा स्थितीत आता आपण हवामान खात्याचा अंदाज नेमका कसा आहे याचाच आढावा येथे घेणार आहोत.
हवामान खात्याचा अंदाज काय सांगतो?
आयएमडी कडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्या गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी उत्तराखंड, पंजाब, पूर्व उत्तर प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये दिवसभर थंड हवामान पाहायला मिळू शकते.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये किमान तापमान पाच ते दहा अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जात आहे.
तसेच मैदानी प्रदेशातील छत्तीसगड येथील अंबिकापुर येथे सर्वात कमी म्हणजेच 3.3° ची तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद मध्ये तीव्र थंडी पाहायला मिळाली आहे. डोंगराळ भागात बहुतेक ठिकाणी तापमान शून्याखाली नोंदवले जात आहे. आता उद्या पण या सर्व राज्यांमध्ये जबरदस्त थंडी राहणार आहे.
दरम्यान उद्यापासून पुढील तीन दिवस पूर्व राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाणा-चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे 12 जानेवारी 2025 पर्यंत दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
मात्र एकीकडे थंडीमुळे आणि दाट धुक्याचा अंदाज देण्यात आला आहे तर दुसरीकडे उद्यापासून 11 जानेवारीपर्यंत तामिळनाडू राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडात पावसाचा अंदाज आहे.
केरळ आणि माहे येथे सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथे सुद्धा वादळासह पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













