Havaman Andaj : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी थंडी, कधी पाऊस तर कधी उकाडा अशी विचित्र परिस्थिती नागरिक अनुभवत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) जानेवारी महिन्यात कडाक्याच्या थंडीचा अंदाज वर्तवला होता.
मात्र, प्रत्यक्षात डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीत थंडीचा जोर कमी असल्याचे चित्र आहे. २५ जानेवारी उजाडली तरीही राज्यात अपेक्षित थंडी जाणवत नाही.

उत्तर भारतात मात्र थंडीचा जोर कायम आहे. पंजाबच्या भटिंडा येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून तेथे तापमान ०.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. याउलट महाराष्ट्रात थंडी तुलनेने सौम्य आहे.
राज्यातील नीचांकी तापमान धुळ्यात नोंदवले गेले असून ते १०.४ अंश सेल्सिअस आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून सकाळी गारठा आणि दुपारी उकाडा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
आज मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही भागांत धुक्याचाही अनुभव येऊ शकतो. याशिवाय काही राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही तासांसाठी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
देशातून मॉन्सून जाऊन अनेक महिने झाले असले तरीही अवकाळी पावसाने पाठ सोडलेली नाही. राज्यात १ जानेवारी रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर थंडी जवळपास गायब झाल्याचे चित्र आहे.
हवामानातील या सततच्या बदलांचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. विशेषतः वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली असून श्वसनाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नवी मुंबईत वायू प्रदूषणाची पातळी वाढल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, शनिवारी दिल्लीत किमान तापमान ६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर कमाल तापमान १६ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात पावसासह तीव्र थंडीचा इशारा देण्यात आला आहे. एकूणच, राज्यात थंडीची प्रतीक्षा कायम असून हवामानातील चढउतारांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.













