Havaman Andaj : नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) उत्तरी सीमा बुधवारी स्थिर आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून दक्षिण महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याने वेळेआधीच म्हणजे येत्या ४८ तासांत राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
राज्यातील पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, उस्मानाबादमध्ये गुरुवारपासून मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे. तर मुंबई, नाशिक, जालना, औरंगाबाद, परभणी या जिल्ह्यांत ७ किंवा ८ जूनपासून मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच १० जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापणार आहे
२५ पेक्षा जास्त जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस तसेच ठाणे आणि मुंबईच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्यातील २५ पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, रायगड, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, अकोला, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पावसाचा येलो अलर्टचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० जूनपर्यंत संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र (किमान जळगावपर्यंत), मराठवाडा मान्सूनने व्यापला जाण्याची शक्यता आहे. तर, विदर्भात अकोला ते नागपूरपर्यंत मान्सूनने व्यापला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे १० जूनपर्यंतच जवळजवळ पाच दिवस अगोदर (१५ जूनच्या सामान्य तारखेपूर्वी) मान्सून ९० टक्क्यांहून अधिक राज्य व्यापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सून गोव्यात दाखल झाला असून सध्या तो उत्तरेकडे वाटचाल करत आहे. तर, बुधवारी कोकणात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. तसेच दक्षिण कोकणासह पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. तर, काही भागात ५० ते ६० कि.मी. वेगाने वारेही वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी राज्यात मान्सून ९ ते १० जून रोजी दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती.
मात्र, आता तो वेळेआधीच राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण राज्यात पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनानंतर मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील काही भागातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ब्रहापुरी (४३.२), गोंदिया (४०.९), नागपुर (४०.५), अमरावती (४०.४), जळगाव (४०.३), वचां (४०.२), परभणी (३९.५), मालेगाव (३९.४), चंद्रपूर (३९.२), यवतमाळ (३९.०), अकोला (३८.४), वाशिम (३८.२), छत्रपती संभाजीनगर (३७.५), अहमदनगर (३६.८), सोलापूर (३६.६),
बीड (३६.२) आणि पुणे (३४.७) अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.