Havaman Andaj : राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रातील पाच महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ हवामान आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत आज आपण आज आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहणार? कोणत्या भागात पावसाची हजेरी लागणार याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

पाच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
22 जानेवारी रोजी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत आज ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. धुळे येथे राज्यातील सर्वात कमी किमान तापमान 10.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर निफाड येथे 10.7 अंश सेल्सिअस तापमान होते.
उद्या 23 जानेवारी रोजी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात संमिश्र हवामान पाहायला मिळणार आहे. काही भागांत धुके, काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये शुक्रवारी सकाळच्या वेळी धुक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
सकाळी गारवा जाणवेल, मात्र दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होऊन उकाडा वाढू शकतो. मुंबईत कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना एकाच दिवसात थंडी आणि उकाडा असा दोन्ही अनुभव घ्यावा लागणार आहे.
कोकण-गोवा पट्टा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रामुख्याने कोरडे आणि सूर्यप्रकाशित हवामान राहील. पुढील चार ते पाच दिवसांत कमाल तापमानात मोठा बदल अपेक्षित नसला, तरी किमान तापमानात चढ-उतार सुरू राहणार आहेत.
काही भागांत किमान तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होण्याची शक्यता असून त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात पुन्हा थंडी थोडी वाढू शकते. दरम्यान, अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग वाढल्याने मच्छिमारांसाठी धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे.
उत्तर अरबी समुद्र आणि सोमालिया किनारपट्टीजवळ वाऱ्याचा वेग 60 ते 65 किमी प्रतितासपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामानातील सततच्या बदलांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. त्यातच मुंबईत वाढलेले वायू प्रदूषण चिंतेचा विषय ठरत असून, प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













