Farmer Success Story :- शेती क्षेत्र आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने खूपच प्रगत झालेले असून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील आता शेतीमध्ये शक्य होऊ लागलेले आहेत. भारतामध्ये जर आपण हवामानाचा विचार केला तर ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असून राज्यनिहाय देखील त्यामध्ये बरीच तफावत आहे.
त्यामुळे भारतातील शेतकरी त्या त्या ठिकाणच्या हवामानाला अनुकूल अशा पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत असतात. परंतु प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून आता कुठल्याही राज्यातील पीक आता कुठल्याही ठिकाणी यशस्वीपणे घेण्यामध्ये शेतकऱ्यांनी हातखंडा मिळवला आहे.
या मुद्द्याला धरून जर आपण केशर शेतीचा विचार केला तर प्रामुख्याने उत्तरेकडील थंड राज्य असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये केशर शेती केली जाते. परंतु आता या केशर चे उत्पादन महाराष्ट्रातील शेतकरी देखील आता यशस्वी करत असून नागपूर मधील एका उच्चशिक्षित दांपत्याने उष्ण असलेल्या नागपूरमध्ये केशरची लागवड यशस्वी करून दाखवली आहे.
उच्चशिक्षित दांपत्याने केली केशरची लागवड
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागपूर येथील बँकेत अधिकारी असलेल्या दिव्या आणि त्यांचे पती अक्षय या दोघांनी शेती क्षेत्रात आवड असल्यामुळे केशर शेती करण्याचा निर्णय घेतला व ती यशस्वी देखील केली आहे.
दिव्या या बँकेत अधिकारी असून अक्षय यांचा व्यवसाय आहे. दोघेही हे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शेतीबद्दल बरीचशी माहिती व त्यामध्ये काहीतरी प्रयोग करण्याची इच्छा होती. या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असताना इंटरनेटवर त्यांना केशर शेतीची माहिती मिळाली.
त्यानंतर त्यांनी हळूहळू या शेतीबद्दल जास्त माहिती गोळा केली व घराच्या बंद खोलीमध्ये देखील आपण केशरची शेती करू शकतो हे त्यांना समजले. याकरता त्यांनी दीड ते दोन वर्ष सतत केशर शेतीचा अभ्यास केला व चार बाय चारच्या एका बंद खोलीमध्ये केशरची शेती यशस्वी केली आहे.
एरोपोनिक्स तंत्रज्ञानाचा यामध्ये त्यांनी वापर केला असून बंद खोली मध्ये केशर लागवडीचा प्रयोग त्यांनी यशस्वी केलेला आहे. केशर लागवड करण्याचा निश्चय केल्यानंतर त्यांनी जम्मू काश्मीर मधील पंपोर जिल्ह्यातून केशर बियाणे आणले व त्याची लागवड केली. केशरचे बियाणे एकदा लागवड केल्यानंतर पाच ते सात वर्षे त्यापासून अनेक रोपे तयार होतात.
केशर शेतीसाठी अक्षय आणि दिव्या यांनी सुरुवातीला पाच लाख रुपये यामध्ये गुंतवले व पाच महिन्यांपर्यंत योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले व काळजी घेतली. केशरची काळजी योग्य प्रमाणे घेतल्यानंतर पाच महिन्यात उत्पादन मिळायला सुरुवात होते.
हे दांपत्य आता त्यांचे उत्पादन स्वतःचं ब्रँडिंग करून विकणार आहे. केशर शेतीचा फायदा म्हणजे यामध्ये केवळ तुम्हाला एकदाच गुंतवणूक करावी लागते परंतु त्यानंतर मात्र नफा जास्त प्रमाणात तुम्हाला मिळत राहतो असं देखील त्यांनी म्हटले आहे.
अवघ्या पाच महिन्यांमध्ये या दांपत्याला तब्बल आठ लाख रुपये किमतीचे दीड ते दोन किलो केशर चे उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. सध्या त्यांनी तीन महिन्यांमध्ये अर्धा किलो किशोरचे उत्पादन मिळवल आहे.
महत्त्वाचे म्हणजे नागपूर सारख्या उष्ण असलेल्या परिसरामध्ये त्यांनी केशर चे पीक यशस्वी केल्यामुळे इतर शेतकऱ्यांना देखील त्यापासून प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की.