Actor Jet Lee Story:- सेलिब्रिटी कपल्सबद्दल वाद, घटस्फोट आणि पोटगीच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. मात्र हॉलिवूड अभिनेता जेट ली याने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
कोणताही विचार न करता त्याने आपली संपूर्ण संपत्ती पत्नीच्या नावे केली आहे. तब्बल 2250 कोटी रुपये (200 मिलियन डॉलर) इतकी गडगंज संपत्ती त्याने पत्नी नीना ली हिच्या नावे करत प्रेम आणि विश्वासाचा एक नवीन आदर्श घालून दिला आहे.
पत्नीच्या साथीबद्दल कृतज्ञता व्यक्त
37 वर्षांपासून आनंदी वैवाहिक जीवन जगणाऱ्या जेट लीने एका मुलाखतीत आपल्या निर्णयाचे कारण स्पष्ट केले. तो म्हणतो, “माझ्या करिअरमध्ये यश मिळवण्यामागे माझ्या पत्नीचा मोठा हात आहे.
ती नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहिली. तिने मला करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची पूर्ण मोकळीक दिली. तिच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हा निर्णय घेतला.”
नीना लीने करिअर सोडून कुटुंबाला दिले प्राधान्य
नीना ली या मिस एशिया किताबाची मानकरी असून विवाहानंतर तिने अभिनय क्षेत्र सोडून कुटुंबाला प्राधान्य दिले. फक्त पत्नी म्हणूनच नव्हे तर जेट लीची असिस्टंट म्हणूनही तिने महत्त्वाची भूमिका बजावली. तिच्या त्यागाची जाणीव ठेवत जेट लीने तिच्या नावे संपूर्ण संपत्ती करून तिच्या प्रेम आणि समर्पणाची योग्य दखल घेतली आहे.
प्रेम, विश्वास आणि समर्पणाचा अनोखा आदर्श
“हा कोणत्याही दडपणामुळे घेतलेली निर्णय नाही तर हे माझ्या पत्नीने केलेल्या त्यागाची कबुली आहे” असे जेट लीने सांगितले. सेलिब्रिटी कपल्सच्या नात्यांबद्दलच्या नकारात्मक चर्चा सुरु असताना या जोडप्याने एक सकारात्मक उदाहरण घालून दिले आहे.
प्रेमाचा खरा अर्थ!
जेट ली आणि नीना ली यांचे नाते हे फक्त प्रेमावर नव्हे तर विश्वास, त्याग आणि समर्पणावर आधारित आहे. हा निर्णय घेत त्यांनी संपूर्ण जगासाठी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.