Maharashtra MLA Salary : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधीची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.
या मागणीच्या अनुषंगानेच कर्मचाऱ्यांनी आमदारांना इतकी पेन्शन दिली जाते किंवा एवढे वेतन दिले जाते तेव्हा सरकारच्या तिजोरीवर भार पडत नाही का इत्यादी बाबत प्रश्न उपस्थित केले होते.
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीकरिता कर्मचाऱ्यांकडून मागच्या वर्षी बेमुदत संप देखील पुकारण्यात आलेला होता. परंतु यामध्ये राज्यावर प्रचंड प्रमाणात आर्थिक बोजा पडेल अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सरकारला आमदारांना एवढी पेन्शन देणे परवडते का असा प्रश्न उपस्थित केलेला होता.
त्या दृष्टिकोनातून आपल्यासारख्यांना देखील प्रश्न येतो की नेमके आमदारांना किती पगार दिला जातो किंवा त्यांना पेन्शन किती मिळते किंवा कोणते भत्ते मिळतात? इत्यादी. याच दृष्टिकोनातून या लेखात आपण याविषयीचे महत्त्वाची माहिती घेऊ.
आमदारांना किती पगार मिळतो?
यामध्ये जर आपण विचार केला तर विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना नियमानुसार पगार तसेच भत्ता व सुविधा दिल्या जातात. याविषयी जर आपण मीडिया रिपोर्टचा विचार केला तर आमदारांना दर महिन्याला साधारणपणे एक लाख 82 हजार दोनशे रुपये पगार मिळतो असे म्हटले जाते. याशिवाय त्यांना इतर अनेक सोयी सुविधा दिल्या जातात.
आमदारांना काही सुविधांसाठी मिळतो इतका भत्ता
एवढेच नाही तर आमदारांना टेलिफोन सुविधासाठी आठ हजार रुपये, स्टेशनरी करिता दहा हजार रुपये आणि संगणक भत्ता म्हणून दहा हजार रुपये भत्ता दिला जातो. यामध्ये आमदाराचे पगार आणि हे भत्ते जर मिळवले तर प्रति महिना साधारणपणे आमदाराला दोन लाख 41 हजार 174 रुपये भत्ता किंवा पगार मिळतो.
तसेच जेव्हा अधिवेशन असते तेव्हा आमदाराला प्रत्येक दिवशी काही विशिष्ट रक्कम भत्ता स्वरूपात दिली जाते. साधारणपणे ही रक्कम प्रत्येक दिवसाला दोन हजार रुपये इतकी मिळते. तसेच राज्यांतर्गत प्रवास असेल तर दरवर्षाला पंधरा हजार रुपये मिळतात व महाराष्ट्र बाहेर जायचे असेल तर त्याकरिता स्वतंत्र 15 हजार रुपये मिळतात.
एवढेच नाही तर आमदाराला विमानतळाहून राज्याच्या मध्येच जायचे असेल तर तो 32 वेळा आणि देशांतर्गत आठ वेळा प्रवास करू शकतो.
आमदारांना निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन किती मिळते?
राज्यामध्ये प्रत्येक आमदाराला पेन्शन म्हणजेच निवृत्तीवेतन दिले जाते. एवढेच नाही तर आमदाराचे निधन झाले असल्यास त्याच्या कुटुंबाला देखील निवृत्तीवेतन मिळते. साधारणपणे माजी आमदाराला प्रति महिना 50 हजार रुपये निवृत्ती वेतन मंजूर करण्यात आले आहे.
यामध्ये देखील एखादा आमदाराने जर एकापेक्षा जास्त टर्म आमदारकी पार पाडली असेल तर त्याला पन्नास हजार रुपयांपेक्षा प्रत्येक टर्म करता दोन हजार रुपये वाढत जातात. आमदारांच्या निधनानंतर पती किंवा पत्नीला चाळीस हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते व रेल्वे प्रवासाचे सुविधा देखील दिली जाते.