Dairy Business:- शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करावा अशी तुमची प्लॅनिंग असेल तर प्रामुख्याने यामध्ये पशुपालन व्यवसायाला म्हणजेच डेअरी व्यवसायाला प्राधान्य देण्यात येते व त्यानंतर शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसायांचा नंबर लागतो. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर पशुपालन व्यवसाय करून यामाध्यमातून दुधाचे उत्पादन मिळवतात व चांगल्या पद्धतीने आर्थिक नफा देखील कमवतात.
आपल्याला माहित आहे की कुठलाही व्यवसाय सुरू करण्याआधी आपल्याला त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते व तेव्हाच व्यवसायाची सुरुवात आपल्याला करता येते. याच पद्धतीने जर आपण दूध व्यवसाय सुरू करायचा असेल तर याकरिता आपल्याला गाय किंवा म्हशीचे पालन करावे लागते.
साहजिकच हे पालन करत असताना आपल्याला त्यांना राहण्याची व्यवस्था करावी लागते व त्याकरिता आपण अत्याधुनिक स्वरूपाचा गोठा उभारण्याचा प्रयत्न करतो. परंतु तुम्हाला जर अत्याधुनिक स्वरूपाचा गोठा उभा करायचा असेल तर त्याकरिता मात्र मोठ्या प्रमाणावर भांडवल लागते.
गाय किंवा म्हशी खरेदी सोडली तर दूध व्यवसायामध्ये गोठा उभारायला जास्त खर्च येत असतो. त्यामुळे व्यवसायाच्या सुरुवातीला खर्च कमीत कमी करण्याच्या दृष्टिकोनातून गोठ्याची उभारणीवर लक्ष देणे खूप गरजेचे असते. आपल्याला माहित आहे की गोठ्याचे दोन प्रकार येतात व यामध्ये बंदिस्त गोठा आणि दुसरा म्हणजे मुक्त संचार गोठा होय.
या दोन्ही प्रकारांमध्ये गोठा उभारणीला वेगवेगळ्या खर्च येत असतो. परंतु यामध्ये जर तुम्ही बंदिस्त गोठ्याऐवजी मुक्त संचार गोठा उभारला तर मात्र तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये दूध व्यवसायाला सुरुवात करू शकतात. कारण मुक्त संचार गोठा पद्धतीच्या तुलनेमध्ये बंदिस्त गोठा उभारण्याला चार ते पाच पट जास्त भांडवल लागते.
त्यामुळे तुम्हाला जर दूध व्यवसाय सुरू करायचा असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही गोठा उभारताना तो बंदिस्त पद्धतीचा न उभारता मुक्त संचार पद्धतीचा उभारावा. जेणेकरून सुरुवातीला तुम्ही कमीत कमी भांडवलात तुमचा दूध व्यवसाय सुरू करू शकतात.
कसा उभारतात मुक्त संचार गोठा?
मुक्त संचार गोठ्यामध्ये दुधाळ जनावरांच्या संगोपन करण्याकरिता यामध्ये मोकळी जागा सोडली जाते व चार बाजूने तुम्ही लोखंडाचे मजबूत कुंपण किंवा बांबूचे कुंपण केले तरी चालते. तुम्ही ज्या ठिकाणी गोठा उभारत आहात त्या ठिकाणी जर पाण्याच्या निचरा होण्याची समस्या उद्भवत असेल
तर तुम्ही गोठा उभारताना त्याच्या तळाशी दगडी किंवा मुरूम टाकून भरून घेणे गरजेचे असते. या ठिकाणी तुम्ही कुंपण घाला व त्याच्या एका बाजूला जनावरांसाठी शेड बांधून जनावरांना ऊन किंवा पावसाच्या कालावधीत आडोसा उपलब्ध करून देणे गरजेचे असते व या शेडमध्येच तुम्ही जनावरांची खाद्य व पाण्याची व्यवस्था करू शकतात.
काय आहेत मुक्त संचार गोठ्याचे फायदे?
1- मुक्त संचार गोठा असेल तर यामध्ये वासरांची वाढ देखील वेगात होते व उत्पादन क्षमता वाढते.
2- तसेच या पद्धतीत मोकळी जागा असल्यामुळे जनावरे शेण किंवा ओल्या जागेवर बसत नाहीत व ते स्वच्छ राहतात तसेच त्यांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत नाही.
3- तसेच दररोज शेण उचलण्याची देखील तुम्हाला गरज भासत नाही.
4- मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये जनावरे मोकळे असल्यामुळे ते ताजेतवाने वाटतात व त्यांचे चारा व पाण्याच्या सेवनावर देखील चांगला परिणाम होतो व पचनसंस्था चांगली राहून दूध उत्पादनात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ होते.
5- या पद्धतीमध्ये मोकळे वातावरण उपलब्ध झाल्यामुळे जनावरांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते व ते आजारी पडत नाही. त्यामुळे तुमचा पशुवैद्यकीय खर्च देखील वाचतो.
6- महत्वाचे म्हणजे जनावर माजावर आले आहे की नाही तुम्हाला लगेच ओळखता येते व योग्यवेळी रेतन करता येते.
7- मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये जनावरे त्यांना लागेल तेव्हा चारा खातात किंवा पाणी पितात व त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते.
8- मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये जनावरे संपूर्ण त्यांच्या मर्जीनुसार वागतात. त्यांना सावलीत बसायचे असेल तर सावलीत बसू शकतात किंवा उन्हात बसायचे असेल तर उन्हात बसू शकतात. जनावरांना मिळालेल्या या स्वातंत्र्यामुळे त्यांचा सकारात्मक परिणाम त्यांच्या आरोग्यावर व दूध उत्पादनावर दिसून येतो.