Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, मिळालेल्या माहितीनुसार हडपसर रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. उद्या 20 जुलै 2025 रोजी हडपसर रेल्वे स्टेशन वरून धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या ह्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. अर्थातच या गाड्यांच्या रूट मध्ये बदल करण्यात आलेला आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी वेळापत्रक तपासावे असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.
या गाड्या राहणार रद्द
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे विभागातील हडपसर स्टेशनवर सुरू असलेल्या सॅटेलाइट टर्मिनल उभारणीच्या कामांमुळे रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. 20 जुलै रोजी नॉन-इंटरलॉकिंग ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून हा ब्लॉक उद्या मध्यरात्री 12 वाजेपासून ते सकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे. यामुळे रविवारी 17 गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाकडून समोर आली आहे. रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांमध्ये पुणे-दौंड डेमू, दौंड-बेलवंडी लोकल, पुणे-हरंगुळ एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस यांचा समावेश आहे यामुळे या रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उद्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान ज्या प्रवाशांनी ऑनलाइन टिकिट आरक्षण केले आहे अशा प्रवाशांना गाड्या रद्द झाल्याबाबत आगाऊ सूचना देण्यात आली आहे.

या गाड्या अंशतः रद्द राहणार
हडपसर रेल्वे स्टेशनवर सुरू असणाऱ्या सॅटॅलाइट टर्मिनल उभारणीच्या कामांमुळे रविवारी जो मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे त्या मेगा ब्लॉकमुळे काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्याचा निर्णय सुद्धा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. जसे की, हडपसर-जोधपूर एक्स्प्रेस आता पुणे स्थानकावरून सोडली जाणार आहे. तसेच जोधपुर – हडपसर एक्सप्रेस ही हडपसर ऐवजी पुण्यापर्यंतच धावणार आहे. हडपसर-काझीपेठ एक्स्प्रेस गाडी सुद्धा या मेगा ब्लॉकमुळे आता दौंड स्थानकावरून सोडली जाणार आहे. हडपसर-सोलापूर एक्स्प्रेस ट्रेन सुद्धा हडपसर ऐवजी लोणी स्टेशन येथून सुटणार आहे. याव्यतिरिक्त सीएसएमटी-बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस साधारणतः चार तास उशिराने धावणार अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे. सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस सुद्धा रविवारी एक तास उशिराने पुणे स्थानकावरून सोडली जाणार आहे.