नवनिर्वाचित खासदारांचे समर्थक राहूल झावरे आणि त्यांच्या पंधरा ते वीस सहकार्यांनी घरात घुसून गर्भवती महीलेवर केलेल्या हल्ल्याची पोलीस प्रशासानाने गंभीर दखल घेवून कारवाई करावी आशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली.निवडणुकीतील पराभव आम्ही स्विकारला, तुम्ही उद्रेक करून विजयाचा आनंद घेवू नका आशा शब्दात भाजपा पदाधिकार्यांनी निलेश लंके यांचा समाचार घेतला.
महायुतीचे उमेदवार डाॅ सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला म्हणून मागील दोन तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या घटना घडत आहे.गुरूवारी गोरेगाव येथे प्रितेश पानबंद यांना शोधण्यासाठी लंके समर्थक राहूल झावरे आणि त्यांचे इतर सहकारी ग्रामपंचायत कार्यालयात गेले.

तिथून ते त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या पत्नी हर्षदा पानबंद व आईला जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना मोठ्या प्रमाणात माराहाण केल्याचा आरोप भाजपाचे तालुका अध्यक्ष राहूल शिंदे यांनी केला. निवडणूक संपल्यानंतर खासदारांच्या समर्थकांनी महायुतीचे उमेदवार डाॅ सुजय विखे पाटील यांचे काम केल्याच्या कारणाने कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याच्या घटनांचे पुरावे शिंदे यांनी माध्यमांना दाखवले.
मारहाण झालेल्या हर्षदा पानबंद यांनी पत्रकार परिषदेत राहूल झावरे यांचे थेट नाव घेवून त्यांनी व त्याच्या समवेत आलेल्या सहकार्यानी माराहाण केली.मी गर्भवती असून पोटातही लाथा मारल्या. माझे कपडे फाडून तुझ्या नवर्याला आजच मारून टाकणार असल्याच्या धमक्या दिल्या याबाबतची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दिली असल्याचे हर्षदा पानबंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काल गावात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली होती.भीतीपोटी पोलीस स्टेशनलाही जाणे शक्य नव्हते.म्हणून आज नगर येथे तोफखाना पोलीस ठाण्यात जावून आपण फिर्याद दिली असल्याचे पानबंद यांनी सांगितले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी निवडणूक झाली आम्ही पराभव स्विकारला आहे.पण तुम्ही विजयाचा आनंद साजरा करताना त्रास देण्याची भूमिका घेवू नका तुमच्या कार्यकर्त्यांना आवर घाला कायम मारून टाकण्याच्या धमक्या देता तुमच्याकडे गोळ्या तरी किती आहेत असा सवाल भालसिंग यांनी केला.यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेवून या घटनेतील सहभागी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली.भाजपाच्या प्रदेश कार्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीच्या बाजूने काम केल्याचा राग मनात धरून मागील काही दिवसांपासून लंके समर्थकांकडून विखे समर्थक कार्यकर्त्यांना समाज माध्यमातून धमकावले जात आहे.दोन तीन दिवसांपासून हे प्रकार घडत आहेत.काल घरांवर दगडफेक आणि गाड्या फोडण्याच्या घटनाही घडल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यामध्ये संताप व्यक्त होत आहे.