Indias Richest Railway Station : भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे नेटवर्क दिवसेंदिवस विस्तारले जात आहे. देशात रेल्वे प्रवाशांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. देशात सध्या स्थितीला साडेसात हजाराहून अधिक रेल्वे स्थानक आहेत आणि काही ठिकाणी नव्या स्थानकाची कामे सुरू आहेत.
पण तुम्हाला देशातील सर्वाधिक श्रीमंत रेल्वे स्थानकांची माहिती आहे का? नाही. चला मग जाणून घेऊया देशातील सर्वाधिक श्रीमंत टॉप पाच रेल्वे स्थानक कोणती आहेत?

‘ही’ आहे देशातील सर्वाधिक श्रीमंत रेल्वे स्थानक
भारतीय रेल्वेमधून मोठा महसूल सरकार दरबारी जमा होत असतो. सरकारी महसूल मध्ये रेल्वेचा मोठा वाटा आहे. भारतीय रेल्वेच्या हजारो स्थानकांमधून रेल्वेला चांगला महसूल मिळतो. रेल्वे स्टेशन हे रेल्वेच्या महसुलाचे एक प्रमुख माध्यम आहे.
रेल्वे स्टेशन मधून रेल्वे प्रशासनाला करोडो रुपयांची कमाई होते. स्टेशनवरील जाहिराती, दुकाने, प्लॅटफॉर्म तिकिटे, वेटिंग रुम इत्यादींमुळे रेल्वेला मोठा पैसा मिळतो. दरम्यान देशातील सर्वाधिक श्रीमंत रेल्वे स्थानकाबाबत बोलायचं झालं तर दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक या यादीत पाचव्या क्रमांकावर येते.
या रेल्वे स्थानकाची वार्षिक कमाई कोटींच्या घरात आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात या रेल्वेस्थानकाने 1227 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच या यादीत तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद हे रेल्वे स्थानक चौथ्या क्रमांकावर येते.
या रेल्वे स्थानकाने एका आर्थिक वर्षात 1276 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंत रेल्वे स्थानकांच्या यादीत चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक तिसऱ्या क्रमांकावर विराजमान असून या स्थानकाची एका वर्षाची कमाई 1299 कोटी रुपये इतकी आहे.
देशातील सर्वाधिक श्रीमंत रेल्वे स्थानक कोणते ?
देशातील सर्वाधिक श्रीमंत रेल्वे स्थानकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालमधील रेल्वे स्थानक येते. हावडा रेल्वे स्थानक हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाचे वार्षिक उत्पन्न 2,692 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
आता आपण देशातील सर्वाधिक श्रीमंत रेल्वे स्थानक पाहूया. एका अधिकृत आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानकाने सर्वाधिक उत्पन्न मिळवले आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकाने या सदर आर्थिक वर्षात 3337 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे, सर्वाधिक महसूल मिळवून हे देशातील सर्वाधिक श्रीमंत रेल्वे स्थानक बनले आहे. दुसरीकडे प्रवासी संख्येच्या बाबत विचार केला असता मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे देशात पहिल्या क्रमांकावर आहे.