चीनमध्ये ‘५जी’ पेक्षा ६० पट अधिक वेगवान इंटरनेट !

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : चीनने लाँच केले जगातील सर्वात वेगवान इंटरनेट ! एका सेकंदात १. २ टेराबाईटचे स्पीड अमेरिकेसह जगातील अनेक देशांना टाकले मागे

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असलेल्या चीनने जगातील सर्वात वेगवान इंटरनेट सेवा सुरू करत जगाला आश्चर्याचा धक्का दिला. चीनचे नवीन नेटवर्क प्रति सेकंद तब्बल १. २ टेराबाईट (१२०० गिगाबाइट) डेटा वाहण्यास सक्षम आहे.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सेकंदाला १५० एचडी चित्रपट डाऊनलोड केले जाऊ शकतात. ही गती सध्याच्या ५ जी इंटरनेट सेवेपेक्षा तब्बल ६० पट जास्त आहे. चीनने या विक्रमी इंटरनेट गतीसह अमेरिकेसह जगातील अनेक देशांना मागे टाकले आहे.

चीनमधील नवीन इंटरनेट नेटवर्क हे अमेरिकेतील सर्वात वेगवान इंटरनेट नेटवर्कपेक्षा तीनपट अधिक तर जगभरातील प्रमुख नेटवर्कपेक्षा १० पट अधिक वेगवान आहे. चीनमधील बीजिंग, वुहान आणि ग्वांगझू या प्रमुख शहरांना ३००० किमीच्या वेगवान फायबर ऑप्टिक केबलद्वारे जोडण्यात आले आहे.

सिंघुआ विद्यापीठ, हुआवेई मोबाइल कंपनी आणि सर्नेट कॉर्पोरेशनच्या सहकार्याने हे नेटवर्क विकसित करण्यात आलेले आहे. २०२५ सालापर्यंत इतक्या गतिमान इंटरनेट सेवेची सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती.

पण चीनने दोन वर्ष अगोदच अशा प्रकारची गती मिळवली आहे. या नेटवर्कला ‘बॅकबोन’ असे नाव देण्यात आले आहे. जुलै महिन्यात सक्रिय करण्यात आलेल्या या नेटवर्कच्या सर्व चाचण्या संपन्न झाल्यानंतर ते अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे.

गतवर्षी फक्त अमेरिकेने आपल्या इंटरनेटची गती वाढवणाऱ्या इंटरनेट-२ सेवेची सुरुवात केली होती. या नेटवर्कद्वारे प्रति सेकंद ४०० गिगाबाईट डेटा वहन केला जाऊ शकतो. पण आता चीनच्या नवीन नेटवर्कने विक्रमी तब्बल १.२ टेराबाईटची गती मिळवली आहे.

या सुसाट गतीमुळे स्वयंचलित कार आणि औद्योगिक वाहनांची क्षमता सुधारण्यास व्यापक मदत मिळण्याची आशा आहे. चीनने आपल्या या स्वदेशी नेटवर्कच्या गतीची तुलना सुपरफास्ट रेल्वेसोबत केली आहे.

चीनची इंटरनेट क्रांती!

सध्या जगभरात जाळे पसरत असलेल्या ५ जी इंटरनेट सेवेचा वेग प्रति सेकंद १० ते २० गिगाबाईट एवढा आहे. तर ६ जी इंटरनेट सेवेच्या माध्यमातून ही गती १०० ते १५० गिगाबाईट एवढी जाईल, असे दावेही आहेत.

अजून अनेक देशांसाठी ५ जी, ६ जी सेवा ही स्वप्नातीतच वाटत असतानाच चीनने मात्र पुढचे पाऊल टाकत तब्बल १.२ टेराबाईट प्रतिसेकंद एवढी प्रचंड गती असलेली इंटरनेट सेवा सुरू केली आहे.

ही गती ५जी पेक्षा किमान ६० पटीने जास्त तर ६ जी पेक्षा किमान १०- १२ पटीने अधिक आहे. एवढेच नव्हे तर या क्रांतिकारी गतीने सध्या अस्तित्वात असलेल्या अमेरिकेतील सर्वात वेगवान इंटरनेट सेवेलाही मागे टाकले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe