Investment Scheme:- गुंतवणूक ही फार महत्वाची असल्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्यायांच्या शोधात असतात व गुंतवणूक सुरक्षित राहून त्यापासून परतावा देखील चांगला मिळेल या दृष्टिकोनातून गुंतवणूक ही केली जात असते. सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय बघितले तर यामध्ये जास्त करून बँक आणि पोस्ट ऑफिस यांना प्राधान्य दिले जाते.
बँकांच्या माध्यमातून देखील अनेक मुदत ठेव योजना राबवल्या जात असून या माध्यमातून चांगला व्याजदर गुंतवणूकदारांना मिळतो व गुंतवणुकीची सुरक्षितता देखील यामध्ये असते व त्यासोबतच पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक प्रकारच्या योजना असून यामध्ये देखील गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवता येतो आणि गुंतवणुकीची सुरक्षितता देखील अबाधित राहते.
अगदी याचप्रमाणे तुम्ही देखील सुरक्षित उत्पन्नाच्या स्त्रोताच्या शोधात असाल तर पोस्ट ऑफिसच्या असलेल्या योजनांपैकी पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना हा एक योग्य पर्याय गुंतवणूकदारांसाठी ठरू शकतो. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक चांगली रक्कम गुंतवणुकीच्या माध्यमातून मिळू शकते. ही एक सरकारी योजना असून ती तुम्हाला आकर्षक व्याजासह दरमहा चांगल्या उत्पन्नाची हमी देते.
कसे आहे पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेचे स्वरूप?
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत योजना( मासिक उत्पन्न खाते) योजना ही एक सरकारी लहान बचत योजना असून जी गुंतवणूकदारांना स्थिर व्याजदर आणि मासिक उत्पन्न मिळवून देते.
या योजनेत गुंतवणूकदाराला 7.4% इतका व्याजदर मिळतो. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला किमान 1000 रुपये गुंतवावे लागतात व नंतर एक हजार रुपयांच्या पटीत गुंतवणूक वाढवता येते. यामध्ये सिंगल खात्यासाठी कमाल गुंतवणूक मर्यादा नऊ लाख रुपये आणि संयुक्त खात्याकरिता 15 लाख रुपये आहे. या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड पाच वर्षाचा आहे.
योजनेअंतर्गत एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त खाती चालवू शकते व त्यातील जास्तीत जास्त रक्कम एकाच किंवा संयुक्त खात्यात गुंतवली जाऊ शकते. या योजनेत खाते चालू केल्याच्या एका वर्षानंतर या योजनेतील खाते मुदतीपूर्वी देखील बंद केले जाऊ शकते.
परंतु यामध्ये तीन वर्षाच्या मुदतीपूर्वी जमा केलेल्या रकमेच्या दोन टक्के वजा करून रक्कम मिळते आणि तीन वर्षाच्या मुदतीनंतर जर खाते बंद केले तर जमा केलेल्या रकमेपैकी एक टक्के रकमेची कपात केली जाते.
किती गुंतवणुकीवर किती मिळते उत्पन्न?
1- पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर– पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 3083.33 रुपये इतके महिन्याला उत्पन्न मिळते.
2- नऊ लाख रुपये गुंतवणुकीवर– पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेमध्ये नऊ लाख रुपये गुंतवले तर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति महिना उत्पन्न मिळते.
3- पंधरा लाखांपर्यंत गुंतवणूक केली तर– पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेमध्ये 15 लाखांपर्यंत गुंतवणूक केली तर महिन्याला नऊ हजार 250 रुपये उत्पन्न मिळते.
( हे परतावे गुंतवणुकीच्या पाच वर्षाच्या कालावधीसाठी निश्चित केले आहेत.)
कुणाला करता येतो अर्ज?
पोस्ट ऑफिसच्या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत एकल प्रौढ, संयुक्त खाते( तीन प्रौढांपर्यंत), अल्पवयीन किंवा अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या वतीने त्याचे पालक आणि दहा वर्षापेक्षा जास्त वयाचे अल्पवयीन देखील या योजनेमध्ये अर्ज करू शकतात व खाते उघडवू शकतात.