Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून धडा घेत महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडके बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे एकूण पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. या योजनेच्या जोरावर महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाले.
एकट्या भाजपाला 132 जागा या निवडणुकीत जिंकता आल्या. शिंदे गट 57 आणि अजित पवार गट 41 जागांवर विजयी झाले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीने जाहीर केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे पंधराशे रुपयांवरून 2100 रुपये करू असे आश्वासन देण्यात आले होते.
यामुळे आता सत्ता स्थापित झाल्यानंतर लाडक्या बहिणीच्या माध्यमातून 2100 रुपयाचा लाभ केव्हापासून मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोयं. दरम्यान आता याचा संदर्भात महाराष्ट्र राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी अपडेट दिली आहे.
काल झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते आणि याच पत्रकार परिषदेत फडणवीस यांना लाडकी बहीण योजने संदर्भात प्रश्न विचारण्यात आले.
यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही योजना पुढेदेखील सुरूच राहील. या योजनेच्या निधीमध्ये वाढ करून २१०० रुपये दरमहा दिले जातील. पण त्यासाठी बजेटच्या वेळी आम्ही विचार करू.
राज्यातील सर्व आर्थिक स्रोत यांचा अभ्यास करून आणि विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्या प्रकारे योग्य पद्धतीने निर्णय घेतले जातील. २१०० रुपये देण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासने दिली आहेत, ती नक्कीच पूर्ण करू.
त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ज्या तरतुदी करण्याची गरज आहे, ती आपण करू आणि जे लोक निकषाच्या आत बसतील, त्यांना योजनांचा लाभ नक्कीच होईल. कोणीही वंचित राहणार नाही, असे फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.
अर्थातच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच लाडके बहिण योजनेच्या पात्र महिलांना 2100 रुपयांचा लाभ मिळणार आहे. दरम्यान या योजनेबाबत पुढे बोलताना फडणवीस यांनी ज्याप्रमाणे पी एम किसान योजनेच्या सुरुवातीच्या काळात काही निकषाबाहेरच्या शेतकऱ्यांनाही लाभ घेतला होता.
नंतर या शेतकऱ्यांनी स्वतःहूनच ते निकषाबाहेरील असून त्यांना योजनेची गरज नाही हे स्पष्ट केले आणि मग अंतिम छाननी करून ती योजना स्थिर करण्यात आली. तशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत देखील महत्त्वाच्या गोष्टींची चाचपणी केली जाईल.
निकषांमधील सर्वांना योजनेचा लाभ मिळेल. लाडकी बहिण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याची महायुती सरकारची अजिबातच मानसिकता नाही. ही योजना सुरुच राहिल, असं मात्र पुन्हा एकदा फडणवीस यांनी स्पष्ट केले.