Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले होते. दरम्यान गेल्या वर्षी संपन्न झालेल्या या विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन महायुती सरकारने राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर या योजनेचा शुभारंभ केला. महत्वाची बाब अशी की या योजनेचा महायुती सरकारला मोठा फायदा झाला.

राज्यातील महिला मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत भरभरून मत दिलीत. दरम्यान तेव्हापासूनच ही योजना चर्चेत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
आतापर्यंत या योजनेचा पात्र महिलांना एकूण 12 हप्ते मिळाले आहेत. जुलै 2024 ते जून 2025 या कालावधी मधील एकूण 12 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. या योजनेचा बारावा हप्ता नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे.
30 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने लाडकी बहीण योजनेच्या बाराव्या हप्त्यासाठी 3600 कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणास मान्यता दिली.
मात्र आता या योजनेच्या संदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी माहिती दिली आहे. राज्यातील हजारो महिलांचा लाडकी बहिण योजनेचा पंधराशे रुपयांचा लाभ बंद करण्यात आला आहे.
या महिलांचा लाभ झाला बंद
खरे तर लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या गडबडीत सुरू करण्यात आली होती यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेचा सर्वच महिलांना सरसकट लाभ मिळाला. पण आता या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आहे आणि या पडताळणीतून ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरत आहेत त्यांचा लाभ बंद केला जातोय.
अशातच आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती लेखी स्वरूपात दिली आहे. तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील 2289 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा लाभ घेतला असल्याचे उघडकीस आले आणि याचमुळे या संबंधित अपात्र सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचारी असून सुद्धा या संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तब्बल 3 कोटी 58 लाख रूपये महिलांनी लाटले होते.
दरम्यान ही माहिती समोर येताच सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे आणि आता या संबंधित अपात्र महिलांकडून हा सगळा पैसा वसूल केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.