Land Acquisition:- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून उभारण्यात येत असलेला महत्त्वाचा असा पुणे रिंग रोड प्रकल्पाचे सध्या भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले असून आता वेगात या प्रकल्पाचे काम सुरू केले जाणार आहे.
या रिंगरोडचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आलेले असून जवळपास पश्चिम भागाचे भूसंपादन पूर्ण झाले आहे व पूर्व भागाची भूसंपादन देखील आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यामध्ये पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाचा माध्यमातून नियोजित असलेल्या या रिंग रोडमध्ये मावळ तालुक्यातील देखील काही गावातील शेतकरी बाधित होत आहेत व यामध्ये मावळ तालुक्यातील इंदोरी या गावच्या शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे.
याच इंदोरी येथील शेतकऱ्यांना आता दीडपट मोबदला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या माध्यमातून आता या गावच्या शेतकऱ्यांना 68 कोटी रुपयांची अतिरिक्त नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
मावळ तालुक्यातील इंदोरी येथील शेतकऱ्यांना मिळणार 68 कोटींचा अतिरिक्त मोबदला
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या नियोजित असलेल्या रिंग रोडमध्ये मावळ तालुक्यातील इंदोरी येथील बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता दीडपट मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयानुसार आता या शेतकऱ्यांना अतिरिक्त 68 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
याबाबत आमदार सुनील शेळके यांनी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला व या गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. या संदर्भामध्ये आमदार सुनील शेळके यांच्या घरी इंदोरीची शेतकरी व पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार व जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्यामध्ये बैठक झालेली होती
व यामध्ये संपादित जमिनीचा अतिरिक्त मोबदला देण्याचा शब्द विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला होता व या संदर्भातील आदेश काढून त्यांनी हा शब्द पाळलेला आहे.
आता कशी असेल पुढची प्रक्रिया?
आता प्रांताधिकारी सर्व संबंधित जमीन मालक असलेल्या शेतकऱ्यांना या नव्या मोबदल्याबाबत उल्लेख असलेल्या नोटिसा बजावतील व त्यांच्याकडून त्यांच्या जमिनी घेण्यासंदर्भातील संमती पत्र घेऊन या नवीन झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी करतील अशा प्रकारची माहिती देखील आमदार सुनील शेळके यांनी दिली.
यामुळे आता रिंग रोडच्या भूसंपादनाचे काम मार्गी लागून त्या कामाला गती प्राप्त होईल असे देखील शेळके यांनी म्हटले आहे. यामध्ये अगोदर जाहीर करण्यात आलेला जो काही संपादित जमिनीचा मोबदला होता तो अपुरा असल्यामुळे तो वाढवून मिळण्याबाबत आमदार सुनील शेळके यांच्याकडे शेतकऱ्यांनी मागणी केलेली होती.
या मागणीचा पाठपुरावा प्रशासन व राज्य शासनाकडे सुनील शेळके यांनी सातत्याने केला व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे आम्ही आमदार सुनील शेळके तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना धन्यवाद देतो अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.