Legal Information:- सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा ग्रामीण भागापासून तर थेट शहरी भागापर्यंत खूप ज्वलंत बनलेला आहे. भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या देखील बातम्या आल्या किंवा अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
अलीकडच्या काही दिवसांअगोदरच वाघ बकरी चहाचे संचालक पराग देसाई हे देखील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये गंभीरित्या जखमी झाले होते व त्यानंतर त्यांचे निधन झाले. अशा घटना बऱ्याचदा घडून येतात. यावेळी साहजिकच आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की भटक्या कुत्र्यांमुळे जर मृत्यू झाला तर याची जबाबदारी नेमके कोण घेऊ शकते किंवा कुणाकडे असते? तसेच या बाबतीत काही कायदा वगैरे आहे का? तर याच प्रश्नांना धरून आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत.
भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला तरी याची जबाबदारी कोणावर असते?
भटके कुत्रे हे गटागटाने फिरत असतात. बऱ्याचदा ते स्वतःचे संरक्षण करण्यासाठी किंवा भुकेले असल्यामुळे देखील व्यक्तींवर हल्ला चढवू शकतात किंवा चावा घेऊ शकतात. तसेच त्यांना त्यांच्या जीवाला धोका किंवा भीती जाणवली तरी देखील ते हल्ला चढवतात. त्यामध्ये काही कुत्रे सतत भुकतात किंवा काही कुत्रे चावल्यामुळे रेबीज नावाचा घातक आजार देखील व्यक्तींना होऊ शकतो.
यामध्ये सरकार आणि प्राणी कल्याण संस्थांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे देशभरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणावर सध्या दिसून येत आहेत. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी ज्या आवश्यक प्रभावी उपाय योजना आहेत त्या राबवण्यासाठी सरकार सपशेल अपयशी ठरले असल्यामुळे आणि त्यासोबतच प्राणी कल्याण संस्था आणि नागरी समाज गटांचा दृष्टिकोन देखील याबाबतीत खूप दुर्लक्षित आणि उदासीन असा राहिला आहे. यावरून सरकारच्या माध्यमातूनच भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी उपाय योजना राबवणे गरजेचे आहे हे दिसून येते.
या बाबतीत काही कायदा आहे का?
याबाबतीत आपण असलेल्या कायद्याचा विचार केला तर त्यानुसार रस्त्यांवरून कुत्रे हटवणे हे बेकायदेशीर असून कुत्र्यांना रस्त्यावर राहण्यापासून कोणीही रोखू किंवा थांबवू शकत नाही. यामध्ये असा नियम आहे की कुत्र्याला जोपर्यंत दत्तक घेतले जात नाही तोपर्यंत त्याला रस्त्यावर फिरण्याचा किंवा राहण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तसेच भारतामध्ये सन 2021 पासून कुत्र्यांना मारण्यावर देखील बंदी घालण्यात आलेली आहे.
याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून 2008 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा जो काही उपद्रवी कुत्र्यांना मारण्याविषयीचा निर्णय होता त्याला देखील स्थगिती दिलेली आहे.तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A(G) मध्ये नमूद करण्यात आलेले आहे की वन्यजीवांचे संरक्षण करणे आणि सर्व सजीव प्राण्यांबद्दल सहानुभूती बाळगणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असून त्यानुसार भटक्या कुत्र्यांना खायला देणे हे देखील समाजात कायदेशीर आहे.
त्याबाबतीत जर आपण दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय बघितला तर दिल्ली उच्च न्यायालयाने मागच्या वर्षी नागरिक आपल्या भागातल्या भटक्या कुत्र्यांना खाऊ घालू शकतात असं देखील नमूद केले होते व तोच आदेश सर्वोच्च न्यायालयाने देखील कायम ठेवला होता.