Gram Crop Variety:- सध्या रब्बी हंगामाची तयारी शेतकऱ्यांच्या माध्यमातून जोरात सुरू असून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रामध्ये हरभरा तसेच गहू, मका आणि कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामध्ये कडधान्य वर्गीय पिकांमध्ये हरभरा लागवड ही महाराष्ट्र मध्ये मोठ्या क्षेत्रावर केली जाते.
हरभऱ्याला मिळणारा बाजार भाव देखील वर्षभर चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे राहण्याच्या दृष्टिकोनातून हे पीक फायद्याचे ठरते. परंतु हरभरा पिक काढणीला जरा किचकट असल्यामुळे यावेळी मात्र मजुरीवर जास्त प्रमाणात खर्च होऊ शकतो.

त्यामुळे हरभऱ्याच्या अशा वाणांची लागवड करावी की जेणेकरून येणाऱ्या कालावधीत यंत्राच्या साह्याने काढणी करता येईल. आणि कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून वेगवेगळे हरभऱ्याच्या व्हरायटी प्रसारित करण्यात आलेले आहेत व त्यातील काही व्हरायटींची यांत्रिक पद्धतीने काढणी करता येणे शक्य आहे.
हरभऱ्याचे या दोन वाणांची यंत्राच्या साह्याने करता येईल काढणी
1- पीडीकेव्ही कनक- हरभऱ्याचा हा वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी साधारणपणे सन 2019 मध्ये संशोधित केला असून महाराष्ट्र, गुजरात तसेच मध्य प्रदेश राज्यांकरिता खास करून प्रसारित करण्यात आलेला वाण आहे.
यंत्राच्या साह्याने काढणी करायला हा वाण उपयुक्त असून याचे दाणे टपोरे मध्यम आकाराचे असतात व विशेष म्हणजे मर रोगाला हा वाण अत्यंत सहनशील असून संरक्षित ओलिताखाली लागवडीकरिता शिफारस करण्यात आला आहे. लागवडीनंतर साधारणपणे 108 ते 110 दिवसात पक्व होतो व हेक्टरी साधारणपणे 18 ते 20 क्विंटल सरासरी उत्पादन मिळते.
2- फुले विक्रम- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी हा वाण विकसित केला असून 2016 मध्ये महाराष्ट्रात लागवडी करिता प्रसारित करण्यात आला आहे व 2019 मध्ये गुजरात, राजस्थान तसेच मध्य प्रदेश व महाराष्ट्रात म्हणजेच एकंदरीत देशपातळीवर लागवडीकरिता प्रसारित करण्यात आला.
हा वाण पिवळसर तांबूस रंगाचा तसेच मध्यम आकाराचे दाणे असलेला असून मर रोगाला प्रतिकारक्षम आहे. हा मध्यम उंच वाढतो व यांत्रिक पद्धतीने काढण्यासाठी योग्य असा वाण आहे.
जिरायत लागवड केली असेल तर सरासरी हेक्टरी 16 क्विंटल पर्यंत तर बागायती क्षेत्रामध्ये हेक्टरी 22 क्विंटल पर्यंत उत्पादन देतो. उशिरा लागवड केली असेल तर हेक्टरी 21 क्विंटल पर्यंत उत्पादन देण्याची क्षमता या वाणात आहे. लागवडीनंतर साधारणपणे 105 ते 110 दिवसात काढणीस तयार होतो.