Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आलेत. दोन-तीन दिवस याच एक्झिट पोलची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होती. दरम्यान, आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांच्या फुटी नंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका झाल्यात अन यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे किंबहुना संपूर्ण देशाचे लक्ष होते.
यावेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, भाजप आणि काँग्रेस हे प्रमुख सहा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. यामुळे यंदाची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली. अहिल्या नगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक देखील लक्षवेधीच होती. कारण म्हणजे या विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते.

त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांचे आव्हान होते. या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होती. खरंतर, शिर्डीचा मतदार संघ हा विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला. या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक विकासकामे केली असून याच विकास कामांच्या जोरावर ते गेल्या काही वर्षांपासून शिर्डीचे प्रतिनिधित्व करत आहेत. यामुळे त्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना आव्हान देणे सोपी बाब नव्हती.
पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठिंब्यातून या ठिकाणी घोगरे ताईंना तिकीट मिळाले. घोगरे यांनी या ठिकाणी विजयासाठी शर्तीचे प्रयत्न सुद्धा केलेत. मात्र आज शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून या ठिकाणी पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झाले आहेत. एक्झिट पोल मध्ये देखील ही जागा राधाकृष्ण विखे पाटील सहज जिंकतील असे म्हटले जात होते. यानुसार, राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथून विजय मिळवला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील हे तब्बल 70282 मतांनी विजयी झाले आहेत. विखे पाटील यांना 1,44,778 एवढे मताधिक्य मिळाले तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रभावती घोगरे यांना 74 हजार वीस एवढे मताधिक्य मिळाले. विखे पाटील यांनी आपला बालेकिल्ला तर शाबूत ठेवलाच आहे, दुसरीकडे आपले कट्टर राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात यांना देखील जोरदार धक्का दिला आहे.
बाळासाहेब थोरात यांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. महायुतीच्या लाटेत थोरात यांच्या किल्ल्याला सुद्धा सुरंग लागले आहे. थोरात यांना शिंदे गटाचे अमोल खताळ यांनी पराभूत केलय. खताळ यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरात मोट बांधली होती. लोकसभा निवडणुकीत थोरात यांनी निलेश लंके यांच्या विजयात मोलाची भूमिका निभावली होती.
थोरात यांच्यामुळेच सुजय विखे पाटील यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, याच पराभवाचा वचपा आता खताळ यांना बळ देऊन राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांवर महायुतीचे वर्चस्व राहिले आहे. अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून संग्राम जगताप, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून आशुतोष काळे, संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अमोल खताळ आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झाले आहेत.
इतरही अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे. यामुळे नगर जिल्ह्यात विखे पाटीलच किंगमेकर ठरले आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांना तर तिकीट मिळाले नाही परंतु त्यांनी इतर उमेदवारांच्या विजय मोठी भूमिका निभावली आणि यामुळे ते खऱ्या अर्थाने अहिल्यानगर जिल्ह्यातील किंग मेकर ठरलेत. या निवडणुकीत महायुतीचं जिल्ह्यात जे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे त्यामध्ये विखे पिता पुत्रांचा नक्कीच मोठा वाटा राहिला आहे.













