Maharashtra Breaking : देशातील गरीब जनतेला हक्काचे घर मिळावे या अनुषंगाने देशात घरकुल योजना राबवली जात आहे. महाराष्ट्रात देखील घरकुल योजना कार्यान्वित आहे. ज्या नागरिकांकडे घर नाही तसेच कच्चे घर आहे अशा नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे.
केंद्राच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व अटल बांधकाम कामगार आवास योजना यांसारख्या घरकुल योजना महाराष्ट्रात कार्यान्वित आहेत.
या योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी अनुदानाची तरतूद आहे. या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 269 चौरस कार्पेट एरिया असलेल्या जागेत एक लाख वीस हजार रुपये ते एक लाख तीस हजार रुपयांपर्यंतचा अनुदान मिळतं. मात्र असे असले तरी अनेकांकडे घर बांधण्यासाठी जागा नसते. अशा परिस्थितीत घरकुल अनुदान योजनेसाठी पात्र ठरलेल्या मात्र भूमिहीन असलेल्या लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी देखील अनुदान मिळत असत.
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजनेच्या माध्यमातून घरकुल योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी 500 चौरस फूट कार्पेट एरिया जागा खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंतच अनुदान दिलं जातं. निश्चितच ज्या शेतकरी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे मात्र त्यांच्याकडे स्वतःची हक्काची जागा नाही अशा लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून जागा खरेदी करता येणार आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, राज्यात भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. याव्यतिरिक्त अतिक्रमण नियमानुकूल करणे, विनामूल्य शासकीय जमिनी संबंधित लाभार्थ्यांना उपलब्ध करणे व इतर माध्यमांतून जागा उपलब्ध करुन देण्यात येते.
हाती आलेल्या एका अधिकृत आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व इतर राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत 111856 एवढे भूमिहिन पात्र घरकुल लाभार्थी आहेत. या एवढ्या भूमिहीन घरकुल योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत 58321 एवढया लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अजून महाराष्ट्रात 53535 एवढे भूमिहीन लाभार्थी शिल्लक आहेत. या लाभार्थ्यांना देखील घरकुल योजनेसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजने संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा.