Maharashtra Bullet Train Project : देशात वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता बुलेट ट्रेन देखील सुरू होणार आहे. येत्या दोन वर्षात अर्थातच 2026 अखेरपर्यंत बुलेट ट्रेन प्रत्यक्षात रुळावर धावताना दिसणार आहे. भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार असून सध्या या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
2026 मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन धावताना दिसणार आहे. विशेष बाब अशी की मुंबई ते अहमदाबाद नंतर देशाला आणखी सात नवीन बुलेट ट्रेन मिळणार आहेत. अशा परिस्थितीत, आज आपण या सात नवीन बुलेट ट्रेन मार्गाची माहिती पाहणार आहोत.
1) दिल्ली ते अहमदाबाद : दिल्ली ते अहमदाबाद यादरम्यानचे अंतर 971 किलोमीटर एवढे असून सध्या स्थितीला या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना जवळपास 16 ते 17 तासांचा वेळ खर्च करावा लागतो. मात्र जेव्हा या मार्गावर 350 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी बुलेट ट्रेन सुरू होईल तेव्हा हा प्रवास अवघ्या तीन ते साडेतीन तासात पूर्ण होणार आहे.
2) दिल्ली ते वाराणसी : दिल्ली ते वाराणसी या दोन शहरादरम्यानचे अंतर 852 किलोमीटर एवढे असून सध्या स्थितीला दिल्ली ते वाराणसी हा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना 12 तास लागतात. मात्र जेव्हा या मार्गावर प्रत्यक्षात बुलेट ट्रेन सुरू होईल तेव्हा हा कालावधी दोन तासांवर येणार आहे. यामुळे दिल्ली ते वाराणसी प्रवास सुपरफास्ट होईल आणि वाराणसी सहित संपूर्ण उत्तर प्रदेश राज्याच्या एकात्मिक विकासाला हा प्रकल्प चालना देणारा ठरणार आहे.
3)दिल्ली ते अमृतसर : दिल्ली ते अमृतसर हे अंतर फक्त 466 किलोमीटर एवढे असून सध्या या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना सात तासांचा वेळ लागतो. मात्र दिल्ली ते अमृतसर दरम्यान जर बुलेट ट्रेन सुरू झाली तर हा प्रवास कालावधी दोन तासांवर येणार आहे. अर्थातच प्रवाशांचे तब्बल पाच तास वाचणार आहेत.
4) मुंबई ते हैदराबाद : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर मुंबई ते हैदराबाद दरम्यानही बुलेट ट्रेन चालवण्याची योजना आहे. मुंबई ते हैदराबाद हे अंतर 710 किलोमीटरचे असून सध्या हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तेरा तासांचा वेळ लागतो. मात्र जेव्हा मुंबई ते हैदराबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरू होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी अडीच तासांवर येणार आहे.
5) मुंबई ते नागपूर : देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते राज्याची उपराजधानी नागपूर या दरम्यानही बुलेट ट्रेन धावणार आहे. मुंबई ते नागपूर यादरम्यान 770 किलोमीटरचे अंतर असून हा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना सध्या दहा तासांचा वेळ लागतोय. मात्र मुंबई ते नागपूर दरम्यान बुलेट ट्रेन सुरू झाल्यास हा प्रवास कालावधी सव्वा दोन तासांवर येणार आहे.
6) वाराणसी ते हावरा : वाराणसी ते हावरा दरम्यानही बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे. सध्या या दोन्ही शहरांतील अंतर 676 किमी इतके असून हे पूर्ण करण्यासाठी 15 तासांपेक्षा अधिक वेळ लागतोय. पण जेव्हा वाराणसी ते हावरा या दरम्यान बुलेट ट्रेन सुरू होईल तेव्हा हा प्रवास फक्त दोन तासात पूर्ण होणार आहे.
7) चेन्नई ते मैसूर : चेन्नई ते मैसूर दरम्यान बुलेट ट्रेन धावणार आहे ही गाडी बेंगळुरूमार्गे धावणार आहे. चेन्नई ते मैसूर दरम्यानचे अंतर 481 किमी आहे. सध्या चेन्नई ते मैसूर या दरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी नऊ तासांचा वेळ लागतो पण जेव्हा या मार्गावर बुलेट ट्रेन धावेल तेव्हा हा प्रवास दीड तासात पूर्ण होणार आहे.