Maharashtra Employee News : राज्यात सध्या राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आंदोलनाचे हत्यार उपसले जात आहे. आज पासून राज्यातील अकृषी विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शनच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्या लवकरात लवकर निकाली काढल्या जाव्यात या आपल्या प्रमुख मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलनावर गेले आहेत.
यामुळे राज्य शासन राज्यातील या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवते का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अशातच राज्यातील अंगणवाडी सेविकांनी देखील संपाच हत्यार उपस्थित आहे. या कर्मचाऱ्यांनी मानधन वाढीसाठी बेमुदत संप पुकारला आहे.

अंगणवाडी सेविकांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलं असून राज्य शासनाचे आपल्या प्रलंबित मागणींकडे लक्ष वेधण्यासाठी या संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने हे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले असून राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका या काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत. यामुळे राज्यातील अंगणवाड्या आता बंद राहणार असल्याचे चित्र आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पूर्व प्राथमिक शिक्षण, पूरक पोषक आहार, लसीकरण, लोकसंख्या शिक्षण आदींविषयी सेवा देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महागाई दिवसेंदिवस वाढत असतानाही अल्प मानधन मिळत आहे. गेली अनेक वर्षे सेवा देऊनही त्यांचे मूलभूत प्रश्न हे प्रलंबितच आहेत. विशेष बाब म्हणजे या अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्न शिंदे-फडणवीस सरकारने सोडवण्याच आश्वासन दिलं होतं.
मात्र वर्तमान शासनाने आपला शब्द पाळला नाही. परिणामी आता या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेश तामिळनाडू केरळ आणि कर्नाटक या राज्यात असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या तुलनेत राज्यातील अंगणवाडी सेविकांना खूपच कमी मानधन मिळत आहे.
यामुळे महाराष्ट्रात देखील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली जावे ही मागणी गेल्या काही महिन्यांपासून जोर धरत आहे. परंतु शासनाने या मागणीवर अद्याप सकारात्मक निर्णय घेतला नसल्याने या कर्मचाऱ्यांनी आज अखेर संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.