Maharashtra Helicopter Project : भारताची अर्थव्यवस्था तेजीने मोठी होत चालली आहे, नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारताच्या अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे फेकले आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अर्थव्यवस्था असून लवकरच आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असा विश्वास व्यक्त होतोय.
दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेत आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा मोठा वाटा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचे स्वप्न पाहिले आहे. दरम्यान आता या दिशेने जलद गतीने काम सुद्धा सुरू झाले आहे.

कारण की आणखी एक महाकाय प्रकल्प आता आपल्या महाराष्ट्रात उभारला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 80000000000 रुपयांचा महाकाय हेलिकॉप्टर निर्मितीचा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात उभारला जाईल. या अनुषंगाने नुकताच एक महत्त्वाचा करार संपन्न झाला आहे.
दरम्यान आज आपण याच महाकाय प्रकल्पाच्या संदर्भातील डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. हा प्रकल्प नेमका कोणत्या जिल्ह्यात होणार, या प्रकल्पामुळे किती रोजगार निर्मिती शक्य आहे, हा प्रकल्प कसा असेल याच साऱ्या बाबींचा आज आपण या लेखातून उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या जिल्ह्यात तयार होणार हेलिकॉप्टर निर्मितीचा प्रकल्प
विदर्भातील नागपूर मध्ये महाकाय हेलिकॉप्टर निर्मितीचा प्रकल्प विकसित होणार असल्याची बातमी समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. या कंपनीकडून नागपूर मध्ये हेलिकॉप्टर निर्मितीची फॅक्टरी उभी केली जाणार आहे.
या समूहाकडून या प्रकल्पासाठी तब्बल आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. दरम्यान, याबाबत राज्य शासनाच्या उद्योग विभागासोबत नुकत्याच एक महत्त्वाच्या एमओयुवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
याचा सामंजस्य करार (MoU) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलाय आणि यामुळे या प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
कधी पूर्णत्वास जाणार हेलिकॉप्टर निर्मितीचा प्रकल्प
या करारानुसार, हेलिकॉप्टर निर्मितीचा कारखाना लवकरच सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील वर्षापासून म्हणजे 2026 पासून या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होण्याची शक्यता आहे.
रोटरी-विंग प्लॅटफॉर्म्सचे कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग यासाठी हा प्रकल्प उत्कृष्टता केंद्र म्हणून कार्य करणार अशी माहिती संबंधितांकडून यावेळी देण्यात आली आहे.
हेलिकॉप्टर निर्मितीच्या प्रकल्पाचा फायदा काय
आठ हजार कोटी रुपयांचा हेलिकॉप्टर निर्मितीचा प्रकल्प उपराजधानी नागपूर येथे विकसित होईल आणि या प्रकल्पामुळे विदर्भात हजारो रोजगारांची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पात थेट 2000 लोकांना रोजगार मिळेल अशी माहिती समोर येत आहे.
यासोबतच हा प्रकल्प विकसित होत असताना आणि विकसित झाल्यानंतरही इतर काही अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. म्हणजेच या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या 2000 हून अधिक रोजगारांची निर्मिती शक्य आहे.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाबाबत बोलताना नागपूरमध्ये संरक्षण उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी यांनी सांगितले की, मी मूळचा महाराष्ट्राचा असल्यानेच महाराष्ट्रातच प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.