Maharashtra New Districts : महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी केली जात आहे. खरे तर, राज्यात असे अनेक मोठे जिल्हे आहेत ज्यातील एका कोपऱ्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या मुख्यालयी जायचे असेल तर एका दिवसापेक्षा अधिकचा कालावधी खर्च करावा लागत आहे.
यामुळे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या जवळपास 18 जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन 22 जिल्हे तयार केले जातील असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून नवीन मालेगाव आणि कळवण जिल्हा तयार होईल असे सांगितले जात आहे.
पण, महाराष्ट्रात नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार की नाही याबाबत राज्याच्या महसूल मंत्र्यांनी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. महसूल मंत्री विखे पाटील यांनी राज्यात नवीन जिल्हे तयार होतील का याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, सध्या स्थितीला शासन दरबारी नवीन जिल्हे तयार करण्याचे कोणतेही नियोजन नाही. परंतु, राज्यातील काही तालुक्यांचे विभाजन करून नवीन तालुके तयार केले जातील अशी माहिती त्यांनी दिली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नवीन तालुक्यांच्या निर्मितीसाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती नवीन तालुके निर्मिती करण्याबाबत शिफारस करणार आहे.
मात्र अद्याप या समितीचा अंतिम अहवाल शासनाकडे जमा झालेला नाही. पण जेव्हा हा अहवाल शासन दरबारी जमा होईल त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीतच यावर निर्णय घेतला जाईल आणि राज्यात काही नवीन तालुक्यांची निर्मिती होईल अशी माहिती महसूल मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून समोर आली आहे.
मात्र, राज्यात सध्या नवीन जिल्हा निर्मितीबाबतचा कोणताच प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शासन सध्या यावर विचार करत नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
मंत्री महोदय यांनी म्हटल्याप्रमाणे नवीन जिल्ह्याच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी उद्भवतात. पैसाही भरपूर लागतो. त्यामुळे हा विषय सध्या सरकाच्या धोरणात नाही.