Maharashtra New Districts : महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक आहे. भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेत आपल्या महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. भारताचे अर्थव्यवस्था येत्या काही वर्षांनी तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास व्यक्त केला जातोय आणि त्याचवेळी महाराष्ट्र देखील लवकरच एक ट्रिलियन डॉलरची इकॉनोमी होईल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र हे शिक्षण, उद्योग, कृषी पर्यटन सहकार अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे आणि आपल्या राज्यात बरेच जिल्हे आहेत जे चांगले व्यवस्थापन आणि विकासास मदत करत आहेत. मात्र वर्षानुवर्षे, राज्यातील नागरिकांकडून प्रशासकीय काम जलद आणि सुलभ व्हावेत या अनुषंगाने भौगोलिक दृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची मागणी केली जात आहे.

पुणे, नाशिक, अहिल्यानगर सहित राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांच्या विभाजनाची मागणी करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब अशी की नुकत्याच काही वर्षांपूर्वी राज्य सरकारकडून या संदर्भातील प्रस्ताव सुद्धा तयार करण्यात आला होता.
या प्रस्तावात नव्याने 22 जिल्हे निर्माण करण्याचे नमूद करण्यात आले होते. पण आजही हा प्रस्ताव धुळखात पडून आहे. पण तुम्हाला महाराष्ट्रातील नवीनतम जिल्हा कोणता आहे याची माहिती आहे का ? आज आपण याच नवीनतम जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत.
हा आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक नवीनतम जिल्हा
महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आणि एकूण 358 तालुके आहेत. राज्यातील हे सर्व जिल्हे सहा महसूल विभागांमध्ये विभागले गेले आहेत. राज्यातील सहा महसूल विभाग म्हणजेच कोकण, नाशिक, पुणे, मराठवाडा, अमरावती आणि नागपूर.
यातील प्रत्येक विभाग सरकारी कार्य अधिक सहजपणे व्यवस्थापित करण्यात मदत करतो आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गुळगुळीत कार्य सुनिश्चित करत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील नवीनतम जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर पालघर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक नवीन जिल्हा आहे.
याची निर्मिती 2014 मध्ये झाली. हा जिल्हा एक ऑगस्ट 2014 रोजी तयार झाला. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. तदनंतर मात्र महाराष्ट्रात कोणताच नवीन जिल्हा विकसित झालेला नाही. पालघर हा महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा म्हणून ओळखला जातोय.
पालघर जिल्ह्याबाबत थोडक्यात
पालघर हा कोकणातील जिल्हा आहे. उत्तर कोकणातील हा जिल्हा हा मुंबई मेट्रोपॉलिटन प्रदेश (एमएमआर) चा एक भाग आहे. पालघर हे शहर वेस्टर्न रेल्वे मार्गावरील हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. हे शहर मुंबईच्या उत्तरेस आहे. मुंबईपासून अवघ्या 87 किलोमीटर अंतरावर आणि विरार पासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर पालघर शहर येत.
तसेच हे शहर मुंबई-अहमदाबाद महामार्गापासून 24 किमी लांब पश्चिमेस आहे. पालघर शहर हे पालघर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. याच्या इतिहासाबाबत बोलायचं झालं तर पालघर हा पूर्वी ठाणे जिल्ह्याचा भाग होता. पालघर जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा हेच ते तालुके.
1942 मध्ये भारत छोडो आंदोलन झाले होते आणि याच आंदोलनात पालघर जिल्ह्याने एक महत्त्वाची भूमिका निभावली होती. चले जाव या चळवळीत सुद्धा पालघर जिल्ह्याची भूमिका महत्त्वाची ठरली होती. येथील लोकांनी ब्रिटिशांच्या विरोधात मोठा लढा उभारला होता.