Maharashtra New Expressway : मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठमोठे रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे. मुंबईतील वाहतूक सुधारण्यासाठी आणि प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी केंद्र सरकारने असाच एक रस्ते विकासाचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) परिसरातील पागोटे ते चौकदरम्यान नवीन सहापदरी महामार्ग तयार होणार आहे. हा नवा एक्सप्रेस वे 29 किलोमीटर लांबीचा राहील.

या प्रकल्पासाठी सुमारे 4 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, हा नव्याने विकसित होणारा जवळपास 30 किलोमीटर लांबीचा मार्ग मुंबई-पुणे जुन्या महामार्गासह कर्जत मार्गालाही जोडला जाणार आहे.
तसेच, या नव्याने विकसित होणाऱ्या महामार्गामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) यामधील वाहतूक अधिक सुलभ होणार असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून होतोय.
या नव्या एक्स्प्रेसवेच्या मदतीने JNPA आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यातील वाहतूक अधिक जलद होणार आहे. हा महामार्ग ‘बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर’ (BOT) मॉडेलअंतर्गत विकसित केला जाणार आहे, ज्यामध्ये एका खाजगी कंपनीला प्रकल्प बांधून देखभाल करण्याची जबाबदारी दिली जाईल आणि काही वर्षांनंतर तो सरकारकडे हस्तांतरित केला जाईल.
सध्या JNPA आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे यांच्यातील रस्त्यांवर प्रचंड वर्दळ असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. पळस्पे फाटा, डी-पॉइंट, कळंबोली जंक्शन आणि पनवेल या ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे तीन तासांहून अधिक विलंब होत असतो.
जवळपास दीड लाखाहून अधिक वाहने दररोज या मार्गांवरून प्रवास करतात, त्यामुळे हा नवीन एक्स्प्रेसवे वाहतूक सुरळीत करण्यास मदत करणार आहे. या प्रकल्पात सह्याद्री पर्वताखाली दोन बोगदे तयार करण्यात येणार असून, त्यामुळे वळणावळणाच्या घाटमार्गांवरून होणाऱ्या प्रवासाचा त्रास कमी होईल.
या नव्या मार्गामुळे अपघातांचे प्रमाण देखील यामुळे घटण्याची शक्यता आहे. हा नवा मार्ग पूर्ण झाला की मुंबईहून गोव्याला जाणे सोयीचे होईल तसेच मुंबई ते पुणे हा प्रवास सुद्धा वेगवान होणार आहे. खरेतर, JNPA हे दररोज मोठ्या प्रमाणात कंटेनर वाहतूक करणार महत्त्वाच बंदर आहे.
शिवाय, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर येथील वाहतूक अधिक वाढणार आहे. म्हणूनच हा नवा 30 किलोमीटर लांबीचा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या नवीन एक्स्प्रेसवेच्या मदतीने मालवाहतूक जलद आणि प्रभावी होणार असून, व्यापार अधिक गतिमान होईल.
यामुळे संपूर्ण राज्याच्या आणि देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे. हा नवा मार्ग केवळ वाहतुकीसाठी नव्हे, तर संपूर्ण मुंबई-पुणे क्षेत्राच्या औद्योगिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
या नव्या महामार्ग प्रकल्पामुळे प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल, तर व्यापाऱ्यांना त्यांच्या मालवाहतुकीसाठी अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित पर्याय मिळणार आहे.