Maharashtra News : महाराष्ट्रातील विदर्भात आता जेट तयार होणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार विदर्भातील नागपूर मध्ये जेट बनवले जाणार आहेत. अनिल अंबानी यांच्या कंपनीकडून हे जेट बनवले जातील आणि यामुळे राज्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.
खरेतर, अलीकडेच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी असलेल्या रिलायन्स एरोस्ट्रक्चर्स लिमिटेडने एक मोठा करार केला आहे. रिलायन्स एरोस्ट्रक्चर्स कंपनीने भारतात फाल्कन 2000 बिझनेस एक्झिक्युटिव्ह जेट बनवण्यासाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनसोबत करार केला असून यामुळे अंबानी यांच्या कंपनीचे स्टॉक शेअर मार्केटमध्ये चांगलेच तेचिता आलेत.

खरे तर अंबानी रिलायन्स एरोस्ट्रक्चर्सने ज्या कंपनीसोबत करार केला आहे ती कंपनी लढाऊ विमान राफेल बनवते. यामुळे हा करार रिलायन्स एरोस्ट्रक्चर कंपनीसाठी मोठा फायद्याचा ठरतोय. या कराराबाबत रिलायन्स इन्फ्राने बीएसईला मोठी माहिती दिली आहे.
कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या फाइलिंगमध्ये असे म्हटले गेले आहे की, हा करार भारताची एरोस्पेस उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल राहणार आहे.
दसॉल्ट एव्हिएशन प्रथमच फ्रान्सच्या बाहेर फाल्कन 2 हजार जेट तयार करणार आहे. या उपक्रमामुळे भारत जेट उत्पादनासाठी एक धोरणात्मक केंद्र म्हणून उदयास येईल असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
प्रथमच फ्रान्स बाहेर तयार होणार बिझनेस जेट
राफेल लढाऊ विमान बनवणाऱ्या दसॉल्ट एव्हिएशनने प्रथमच फ्रान्सबाहेर फाल्कन 2000 बिझनेस जेट विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे जेट आपल्या नागपुरात विकसित होतील. हा उपक्रम नागपूरमध्ये उभारण्यात येणार असून,
त्यामुळे भारतात एरोस्पेस उद्योगाला चालना मिळणार आहे. या करारामुळे भारत व्यवसायिक जेट उत्पादनात अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझील यांच्यासारख्या देशांच्या क्लबमध्ये सामील होणार अशीही माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.
शेअर मध्ये झाली इतकी वाढ
दरम्यान, या कराराच्या घोषणेनंतर रिलायन्स इन्फ्राचा शेअर गुरुवारी म्हणजे 18 जून 2025 रोजी दुपारी पाच टक्क्यांनी वाढला. हा स्टॉक 386 रुपयांवर पोहोचला. दरम्यान या स्टॉकमध्ये गेल्या एका महिन्याच्या काळात 38.12% ची आणि गेल्या एका वर्षाच्या काळात 83 टक्क्यांची वाढ झाली आहे.
रिलायन्स इन्फ्रा या कंपनीबाबत बोलायचं झालं तर ही कंपनी दिल्लीतील वीज वितरण, ईपीसी सेवा, संरक्षण, रस्ते, मेट्रो आणि विमानतळ प्रकल्पांमध्ये कार्यरत आहे.
दरम्यान आता दसॉल्टसोबतचा करार ही या कंपनीसाठी एक मोठी संधी ठरणार आहे आणि भारताच्या संरक्षण व हवाई उद्योगात आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल राहणार आहे.