Maharashtra Rain : राज्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस अजूनही राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात कोसळत आहे. प्रामुख्याने पुणे अहमदनगर धुळे जळगाव छत्रपती संभाजी नगर आणि विदर्भातील काही जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पावसापासून वंचित असलेल्या कोकणात आणि मुंबईमध्ये देखील कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांना देखील आता फटका बसला आहे.
अवकाळी पाऊस सोबतच गारपीट यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा ही काढणी योग्य पिके अन केळी, पपई, द्राक्ष, डाळिंब ही फळबाग पिके मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहेत.

हे पण वाचा :- ठाणे ते बोरिवली प्रवास आता फक्त 20 मिनिटात; भूमिगत मार्गाच्या वाढीव खर्चास प्राधिकरणाची मान्यता, केव्हा सुरु होणार काम? पहा….
दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने राज्यात पावसाची शक्यता कायम आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.
त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांसहित सामान्य जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. हवामान विभागाच्या मते, पुढील 24 तासात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर काही ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल.
हे पण वाचा :-चर्चा तर होणारच! शेतकऱ्याने कांद्याच्या शेतात उभारली अनोखी गुढी; बळीच राज्य येऊ दे! म्हणतं शासनाकडे घातलं साकडं
कोणत्या जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस
नासिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, मुंबई, सोलापूर, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाने दिली असून संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला जात आहे. काल मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस पडला आहे. दरम्यान आज कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अशातच पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडणार आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता लक्षात घेता शेतकरी बांधवांनी पुढील 24 तास आपली व आपल्या पशुधनाची काळजी घेणे गरजेचे राहणार आहे.