Maharashtra Schools : महाराष्ट्रातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, महाराष्ट्र राज्यातील सर्वच शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या दुसरी ते आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांमध्ये घेतल्या जाणार आहेत.
या तीन चाचण्यांपैकी पहिली पायाभूत चाचणी पुढल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात होणार आहे. दरम्यान याच ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या चाचणीचे संपूर्ण वेळापत्रक सुद्धा समोर आले आहे. राज्यातील शाळांमधील दुसरे ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पहिली पायाभूत चाचणी ही 6 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत घेतली जाणार आहे.

या चाचणीत विद्यार्थ्यांच्या प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे मूल्यमापन करण्यात येणार अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. ही चाचणी एकूण 10 माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी लागू असेल असे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पहिल्या पायाभूत चाचणीचे वेळापत्रक कसे आहे
दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पहिली पायाभूत चाचणी 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान घेतली जाईल. यासाठीच्या प्रश्नपत्रिका येत्या तीन दिवसांनी म्हणजेच 14 जुलैपासून वितरित केल्या जाणार आहेत. 14 जुलै ते 28 जुलै दरम्यान राज्यातील सर्वच शाळांना प्रश्नपत्रिका वितरित करण्यात येणार आहेत.
सहा ऑगस्ट 2025 रोजी प्रथम भाषा, 7 ऑगस्ट रोजी गणित आणि 8 ऑगस्ट रोजी तृतीय भाषा इंग्रजीची परीक्षा घेतली जाणार आहे. प्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर लगेचच त्याच दिवशी तोंडी परीक्षा घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
मात्र ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असेल त्यांना दुसऱ्या दिवशी देखील परीक्षा घेता येईल असे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्रात किंवा दुपार सत्रात घेतली जाऊ शकते. जर समजा शाळांना या वेळापत्रकामध्ये बदल करायचा असेल तर त्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी SCERT कडून परवानगी घ्यावी असे सुद्धा निर्देश देण्यात आले आहेत.
संपूर्ण वर्षभरात तीन टप्प्यात चाचण्या होणार
महाराष्ट्रातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी या चाचण्या तीन टप्प्यांत घेतल्या जाणार आहेत. पहिली चाचणी (पायाभूत) पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे. दुसरी चाचणी ही ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घेतली जाईल. तसेच तिसरी चाचणी पुढील वर्षी एप्रिल मध्ये घेतली जाणार आहे.